तुझे वारीचा मी भिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:24 AM2018-07-11T01:24:04+5:302018-07-14T11:18:10+5:30
-इंद्रजित देशमुख-
चेतनेला अगदी सहज चैतन्याचा साज करवणारा माउली ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा आज सासवडहून निघून शिवरी येथे दुपारचा प्रसाद घेऊन जेजुरीत विसावणार आहे; तर आमचे तुकोबाराय आज यवतहून मडगावमार्गे बरंबटमध्ये विसावणार आहेत. आनंदाची नुसती दिवाळीच दिवाळी असणारे हे दोन्ही सोहळे अवघ्या मुलखावर कृपेचा वर्षाव करत चालले आहेत. कारण मुळातच भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे अनंत असे. आणि त्या अनंताला संतरूपात संत खेचून आणतात आणि आपल्यासोबत त्याला चालायला भाग पाडतात. जर तो आनंदस्वरूप आहे तर तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार
‘अवघी आनंदाची सृष्टी झाली’ याची अनुभूती येते.
या आनंदावर साज चढविणारी आणखीन एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे आज जेजुरीत जाऊन मल्हारी मार्तंडाचं दर्शन घडणार आहे. कारण ज्या संतांनी हरी आणि हर हा भेद मिटवून वैशिष्ट्यपूर्ण असे एकत्वाचे तत्त्व बांधले त्याचा आज इथे बोध होणार आहे. हरी आणि हर हे दिसायला जरी वेगळे असले तरी असायला एकच आहेत हे सांगताना आमचे नाथराय आम्हाला सांगतात की,
त्रिशुलावरी काशी पुरी । चक्रावरी पंढरी ।
दोघे सारखे सारखे । विश्वनाथ विठ्ठल सखे ।।
एका जनार्दन हरिहर । एका वेलांटीचा हा फेर ।
यावर तुकोबाराय म्हणतात की, हरी हरा हा भेद नाही । नका करू वाद ।। अशा या मल्हारी मार्तंडाच्या दारी ‘येळकोट-येळकोट जय मल्हार’ करत याचक वृत्तीने उभे राहून आमचे नाथराय होऊन विनवतात की,
‘वारी वो वारी ।
देई का गा मल्हारी।
त्रिपुरारी हरी ।
तुझे वारीचा मी भिकारी ।।
वाहन तुझे घोड्यावरी ।
वरी बैसली म्हाळसा सुंदरी ।
वाघ्या मुरळी नाचती परोपरी ।
आवडी ऐसी पाहीन जेजुरी ।।
ज्ञान कोरवा घेऊनी आलो द्वारी ।
बोध भंडार लावीन परोपरी ।
एका जनार्दनी विनवी श्रीहरी ।
वारी देऊनी प्रसन्न मल्हारी ।।
तुझ्या वारीचा मी भिकारी आहे. मला सदैव या वारीची जाणीव राहू दे. आदिमाया म्हाळसेसोबत तू घोड्यावर बसला आहेस. वाघ्या आणि मुरळी नाचत आहेत. मला या जेजुरीला पहावं असं वाटतंय. या वारीत येताना मी ज्ञानरूपी कोरवा घेऊन आलोय. त्यामध्ये बोधरूपी भंडारा भरलाय. मी तो सगळ्यांना लावीन आणि सगळ्यांना बोधावर आणीन. या माझ्या विनंतीने मल्हारी मार्तंड आपणही प्रसन्न होऊन आशीर्वाद द्याल.
याच खंडेरावांच्या वारीबद्दल शांतीब्रह्म एकनाथ महाराज खोलवर जाऊन सांगतात.
अहंवाद्या सोहंवाद्या प्रेमनगरा वारी ।
सावध होऊनि भजनी लागा देव करा कैवारी ।।
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी ।
इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नर्कद्वारी ।।
बोध बुधली ज्ञानदिवटी उजळा महाद्वारी ।।
आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारोहारी ।
एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी।।
आमच्या आत सुरू असलेले अहं आणि सोहं हे दोन वाघे प्रेमाच्या अनुभूतीने बोधावर येऊन, त्या बोधानुमतीने सावधपणे भजन करूया आणि त्या मल्हारीला आपला कैवार देऊन जगावं आणि ही वारी साधावी असं नाथराय म्हणतात. मात्र, वारी करताना इच्छेच्या आहारी गेलो तर
नरकात पडायची वेळ येईल. त्यासाठी ज्ञानाची दिवटी या देहाच्या म्हणजेच आत्मदेहाच्या द्वारी उजळावी. नवविधा भक्तीतील श्रेष्ठ भक्ती जी आत्मनिवेदन ती आत्मनिवेदनाची वृत्ती जोपासत निवांत व्हावे.
अशी वारी करावी की, ज्यामुळे खंडेराव प्रसन्न होतील. वरील दोन्ही अभंगांत नाथांनी वापरलेली रूपके अंतर्लक्षी आहेत. आपल्या सर्वांच्या अंत:करणात वास करणारा तो त्रिपुर आणि अरी म्हणजेच त्रिपुरारी असणारा तो हरी म्हणजेच मल्हारी आहे. सतत त्याच्या जाणिवेपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडणं म्हणजेच वारी. मन, चित्त, बुद्धी, अहंकार या चार पायांच्या अंत:करणरूपी घोड्यावर त्याचा मायेसोबत वास असतो. प्रकृती आणि पुरुष हे वाघ्या-मुरळी सतत नाचत असतात. असा जयजयकार ज्या उरात असतो ती जेजुरी. प्रत्येकाचा देह म्हणजेच एक देवालय आहे. प्रत्येकाच्या आत वास करणाऱ्या त्या प्रभूच्या अस्तित्वामुळे देहाच्या द्वाराला देवाचं द्वार म्हटलं गेलंय. या द्वारातून आत जाणाºया आणि बाहेर येणाºया श्वासालाच अहं व सोहं म्हटलं गेलंय. या अहं व सोहंवर लक्ष ठेवून जो दक्ष राहील त्याला देवच आपला खराखुरा कैवारी आहे हा साक्षीभाव, सावधपणा किंवा अखंड जाणीव येत राहील. नाथांनी अगदी सोप्या शब्दांत रेखाटलेला हा भावविलास आमच्या जीवनातही उतरावा आणि आम्हीही त्या अनुभवाचे धनी व्हावे ही या मल्हारी मार्तंडाच्या चरणी प्रार्थना...
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)