आपल्या विचारांचा समाेरच्यावर सुद्धा हाेताे परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 08:21 PM2019-11-10T20:21:50+5:302019-11-10T20:22:38+5:30
चांगला विचार केल्यास चांगल्या व्यक्ती व चांगल्या स्थितीला आपण आकर्षित करत असताे.
एक राजा आपल्या लवाजम्यासह चालला असताना एक इसम समोरून आला . राजाची व त्याची नजर एकमेकांना भिडली , त्वरित राजाने त्यांच्याकडे बोट दाखवून क्रोधाने, त्या इसमाला पकडा , मारा व जेलमध्ये टाका अशी सैनिकांना आज्ञा केली . राजाज्ञा होताच सैनिकांनी त्याला पकडून मारत मारत तुरुंगात टाकले . दुसऱ्या दिवशी प्रधानाने राजाला त्या इसमाला तुरुंगात टाकण्याचे कारण विचारले , तेव्हा राजाला याचे कारण काहीच सांगता येईना . राजा म्हणाला ,प्रधानजी , काय कळलं नाही पण तो समोर दिसला आणि मला खूप राग आला . क्रोधीत अवस्थेत मी भान हरपल्यामुळे त्याला पकडा , मारा , आत टाका असे म्हणालो . यावर तुम्हीच काय तो निर्णय त्याच्याबाबतीत घ्या , आध्यात्मिक वृत्तीच्या प्रधानाने तुरुंगात जाऊन त्या माणसाची चौकशी सुरू केली .
तेव्हा तो माणूस प्रधानाच्या प्रश्नांना उत्तर देत म्हणाला , साहेब राजाने मला मारायला व तुरुंगात टाकायला का सांगितलं माहीत नाही , पण माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज आहे . माझ्याकडे तिच्या लग्नकार्यासाठी पैसे नाहीत . पण चंदनाची लाकडे आहेत . पण ही लाकडे कोण विकत घेणार ? हा विचार चालू असताना राजा लवाजाम्यासाह समोरून येताना दिसला व चटकन माझ्या मनात विचार आला , हा राजा जर मेला तर माझी चंदनाची लाकडे खपतील . कारण राजाला चंदनाची चिता रचावी लागते . तेवढ्याच राजाने आज्ञा केली व मला सैनिकांनी मारत - तुरुंगात टाकलं. प्रधानाला अज्ञात गोष्टीचा उलगडा झाला . त्या माणसाच्या राजाविषयीच्या नकारात्मक व हानीकारक विचारांनी राजाला आतून अस्वस्थता व बेचैनी निर्माण झाली , म्हणून राजाने पकडा - मारा - आत टाका ही आज्ञा केली . खरोखर आपण समोरच्या माणसाविषयी मनात करत असलेल्या विचारांचा पण त्याच्यावर परिणाम होतो , म्हणून मन एखाद्याविषयी वाईट विचार करू लागले , कि त्याला विचारा - एक क्या बोलता तू ? व सावध व्हा .आपण समोरच्या व्यक्तीविषयी जो विचार करतो तो विचार त्या व्यक्तीच्या अंर्तमनाला तरंगाच्या रुपाने पोहचतो. व ती व्यक्ती तुमच्याशी तसाच व्यवहार करते. म्हणून मनातील विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल . गौतम बुद्ध म्हणतात जसा तुम्ही विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. सर्व विश्व तरंग आहे . ज्या प्रकारचा तुम्ही विचार कराल त्या तरंगाची तुम्ही निर्मीती कराल . त्या प्रकारच्या तरंगाशी तुम्ही ट्युनअप व्हाल . म्हणून सकारात्मक विचार करा त्यामुळे चांगल्या व्यक्ती व चांगल्या स्थितीला तुम्ही आकर्षित कराल .
- डॉ. दत्ता कोहिनकर ( माईन्ड पाॅवर ट्रेनर)