श्रद्धेला ऊर्जस्वित बनवणारे, सकारात्मकता व विश्वास वाढवणारे अधिष्ठान म्हणजे अध्यात्म

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 09:32 AM2020-03-05T09:32:13+5:302020-03-05T09:37:42+5:30

दु:खाच्या समस्त संवेदनांना अनुभवताना दु:खरहित शाश्वत मानसिकता मिळवण्याचा मार्ग किंवा साधन म्हणजे अध्यात्म होय.

importance of Meditation and Spiritual Life | श्रद्धेला ऊर्जस्वित बनवणारे, सकारात्मकता व विश्वास वाढवणारे अधिष्ठान म्हणजे अध्यात्म

श्रद्धेला ऊर्जस्वित बनवणारे, सकारात्मकता व विश्वास वाढवणारे अधिष्ठान म्हणजे अध्यात्म

googlenewsNext

अध्यात्म मानव जीवन व मानवी मनाच्या गरजेतून, जिज्ञासेतून उदयास आले आहे. मानवाच्या संशोधन बुद्धीने विकसित केलेले साधना क्षेत्र, साधना मार्ग यांचा विस्तार व एककेंद्रीय ध्येयाने केलेली वाटचाल यातून धर्म व तत्त्वज्ञान तयार झाले आहे. धर्म अध्यात्माचे व्यवहार्य, आचरणीय स्वरूप आहे. नैतिकतेशी त्यांची सांगड घातली आहे. ‘माणूस’ म्हणून माणसाला जगण्यासाठी, अनुभवण्यासाठी धारण केलेले उत्तम आचार-विचार, विधि-निषेध, स्वत: मधल्या व सृष्टीत सामावलेल्या चैतन्याचा स्वानुभूतीने घेतलेला वेध व त्यासाठीची विशिष्ट प्रणाली, त्याचे नियम, या सर्वांचा समन्वय म्हणजे धर्म होय.

स्वानुभूत आत्मज्ञानाचे प्रकटीकरण म्हणजे तत्त्वज्ञान होय. अध्यात्मात धर्म व तत्त्वज्ञान आहे; परंतु हे दोन घटक म्हणजे अध्यात्म नव्हे. अध्यात्म म्हणजे आत्मविद्या आत्मसात करत करत ‘मी’ विसरण्याच्या सर्वात्मक सर्वोऽहंच्या उपलब्धीपर्यंतचा जाणिवेचा प्रवास होय. ‘कोऽहं’ म्हणजे ‘मी कोण आहे’ या प्रश्नापासून ‘सोऽहं’पर्यंतची अनुभूती यात्रा म्हणजे अध्यात्म होय.

दु:खाच्या समस्त संवेदनांना अनुभवताना दु:खरहित शाश्वत मानसिकता मिळवण्याचा मार्ग किंवा साधन म्हणजे अध्यात्म होय. समस्त दु:खदायी व्यापात राहूनही मन:शांती देणारे साधन, मनोवस्था म्हणजे अध्यात्म होय. अध्यात्म आत्मदर्शनाचे प्रवेशद्वार आहे. अध्यात्म नराला नारायण बनवण्यासाठी केलेली भाव, विचारांची ऊर्ध्व यात्रा आहे. मूल्यांना पाठबळ देणारे, मानवतेचे रक्षण करणारे, श्रद्धेला ऊर्जस्वित बनवणारे, सकारात्मकता व विश्वास वाढवणारे अधिष्ठान म्हणजे अध्यात्म होय.

भारतीय अध्यात्म कर्माला सुसंस्कारित वळण देते, भक्तीला खोली व अनन्यता देते. अध्यात्म ज्ञानाचे दरवाजे खोलण्याचे, ज्ञानाचा प्रकाश प्रसारित करण्याचे, ते ज्ञान ब्रह्मानंदमय करण्याचे, उदात्तता अनुभवण्याचे सामर्थ्य देते. माणसाची तृप्ती कधीही मर्यादित गोष्टींनी होत नसते. वास्तविक तृप्तीसाठी त्याला सीमातील, अनंत, अलौकिक अनुभवण्याचा ध्यास असतो. हा ध्यास त्याच्या ‘माणूसपणाची’ निशाणी आहे. ‘‘नास्ते सुखमस्ति, भूमैव सुखम्!!’’ हे असीम, अनंत ईश्वर आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, आत्मा-परमात्मा यांचे मीलन बघण्याचा शाश्वत ब्रह्मानंद आहे. म्हणून त्याच्याकरिता व्याकुळ होणारे मानव मन, मीरेच्या भक्तिप्रेमाच्या उत्कटतेतून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अधीर बनते, आसुसलेले असते. हे निर्लेप, निर्मम, अनासक्त ब्रह्मतत्त्व प्राप्त करण्यासाठी माणसाला आपल्या आसक्तीचा त्याग करून समस्त वासनांना तिलांजली द्यावी लागते, एवढेच नाही तर जे परमकाम्य आहे, त्याचा ‘समानधर्मा’ बनावे लागते. महाभारतात शांतिपर्वात तुलाधाराने जाजलि या जिज्ञासूला धर्म अध्यात्माचे स्वरूप स्पष्ट करताना म्हटले आहे - ‘‘सर्वेषां या सुहृनित्यं सर्वेषां यो हिते रत:। कर्मणा मनसा वाचा स धर्म वेद जाजले।।’’ हे जाजली, जो मनुष्य मन, वचन व कर्मांनी सर्वांचा खरा मित्र आहे. जो सतत सर्वांच्या हितासाठी मग्न असतो, त्यालाच धर्म कळलेला असतो. अहिंसा, सत्य, आस्तेय, पावित्र्य, इंद्रियनिग्रह, मन:संयम, नैतिकता, निर्मळता, मानवता इत्यादी उत्तम आचरणातून उत्तम मनोधारणेतून सर्वकल्याणाची भावना बळकट केली जाते. जेथे सर्वकल्याणाची भावना आहे, तेथे समानता, एकता, अखंडता आहे. संतांनी अशा आध्यात्मिक मनोवृत्ती निर्माण करण्याचा आजीवन प्रयत्न केला. त्यांनी अध्यात्म जगायला शिकवले, त्यांनी श्रद्धा डोळस केल्या. त्यांनी अमानवीयता, निरर्थक कर्मकांड, पाखंड, देखावा, कोरी विद्धत्ता, संकुचितता, अन्याय्य रूढी, प्रथा यांच्या विरोधात झुंज दिली.

- प. पू. अण्णासाहेब मोरे

(लेखक दिंडोरी येथील स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख)

 

Web Title: importance of Meditation and Spiritual Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.