जन्माला येणाऱ्या जीवाला महान कार्यासाठी प्रेरित करणारं आईचं अध्यात्म!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:31 AM2018-12-05T05:31:07+5:302018-12-07T23:41:26+5:30
ती आई कठोर होती. तिने मुलाला कठीण प्रश्नांची उत्तरे शोधायला भाग पाडले. स्वातंत्र्याची आणि स्व-तंत्रची गणिते सोडवायला भाग पाडले.
- विजयराज बोधनकर
ती आई कठोर होती. तिने मुलाला कठीण प्रश्नांची उत्तरे शोधायला भाग पाडले. स्वातंत्र्याची आणि स्व-तंत्रची गणिते सोडवायला भाग पाडले. शक्तीचे, बुद्धीचे, चातुर्याचे स्व अध्याय तिने त्याला कोळून पाजले. आईच्या कठोर शिक्षण संस्कारांमुळे मुलगा स्वत:च्या प्रेमात न पडता स्वातंत्र्याची रणनीती आखू लागला. स्वातंत्र्याचं अध्यात्म आईच्या पाऊलावर मस्तक ठेवून आत्मसात करू लागला. पुस्तकातलं अध्यात्म बाजूला सारून कर्माचं अध्यात्म जाणिवेच्या स्पर्शातून अनुभवू लागला. शरीर, मन, बुद्धी या निसर्गदत्त देणगीला समईतल्या ज्योतीसारखं जपू लागला. आतून मिळणाऱ्या उत्तरांवर आईसारखं प्रेम करू लागला. आजूबाजूचे पंचागातले शकुनी त्या मुलाने कधीच पायाखाली चिरडले आणि पंचांगापेक्षा पंचमहाभुतांच्या पायावर त्याने शरणागती पत्करली. आत्मबळाची त्याला प्रचिती आली. तिच्या कठोर शिक्षणाचा अर्थ राष्ट्रहिताच्या विकासासाठी विचारात घेतला. इथला प्रत्येक जीव सत्याच्या बाजूने लढला तर बलाढ्य शत्रूही सत्याच्या पायावर लोळण घेईल अशी तिची शिकवण त्याने प्रत्यक्षात उतरवली.
आईची नाळ जर शाश्वत विचारांची असेल तर शब्दापलीकडचं अध्यात्म फक्त कृतीतून ती नक्कीच जन्मास घालू शकते. आई हे प्रेमळ सूत्र आहे. ती दिव्य शस्त्रही आहे. अधोगतीतून ती गती बाजूला काढून त्या जन्माला येणाºया जीवाला महान कार्यासाठी प्रेरित करू शकते. पण, आज आईची गुणसूत्रेच बदलली आहेत. आईच्या विचारांची बैठकच आज चंचलतेच्या वृत्तीतून वेगवान प्रवासकर्ती बनलीय. पण, ज्या आईने कठोर बनून ज्या मुलाला घडवलं तशी आई आणि तसा मुलगा आज जन्माला येऊ शकेल काय? ज्या आईने ज्या मुलाला घडविलं तिचं नाव होतं जिजाबाई आणि जिच्या पक्क्या विचारातून ज्या मुलाने आपलं स्वतंत्र विकसित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज! काय ते पुन्हा होऊ शकतील? हा प्रश्न प्रत्येक होणाºया आईनेसुद्धा स्वत:ला विचारावा.