ज्या बुद्धीला प्रयोगशील प्रयत्नवादाची जोड मिळते तीच बुद्धी धारदार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:54 AM2019-03-06T04:54:14+5:302019-03-06T04:54:19+5:30
एखाद्या गोष्टीला सतत वापरत राहिले की, तिला धार चढते.
- विजयराज बोधनकर
एखाद्या गोष्टीला सतत वापरत राहिले की, तिला धार चढते. तिचा उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात, परंतु एखादी गोष्ट फक्त पडूनच राहिली की, त्या गोष्टीची क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि कालांतराने ती मृत होत जाते. बुद्धी ही अशीच गोष्ट आहे. ज्या बुद्धीला प्रयोगशील प्रयत्नवादाची जोड मिळत राहते, अशा व्यक्तीची बुद्धी नेहमीच धारदार होत जाते. खरे तर बुद्धीला प्रयोगशाळा म्हटले, तरी योग्य होईल. मेंदूंच्या पेशींची क्षमता प्रचंड आहे. त्या बुद्धीच्या अस्तित्वातून जाणिवेने माणूस कुठलीही निर्मिती करू शकतो. पुराणकाळापासून ते आतापर्यंत अचाट, अजस्त्र शोध मानवाने लावले. बुवाबाजीच्या जाळ्यात अडकलेला बराचसा समाज बुद्धीच्या महाद्वारातून स्वत:कडेच सामर्थ्याच्या नजरेने पाहू लागला. जातीपातीची लादलेली बंधने झुगारून फक्त एक मानव या भूमिकेतून प्रगतीच्या महामार्गावरून चालताना त्याला एकच साक्षात्कार होऊ लागला की, तो म्हणजे सातत्याने बुद्धीला प्रज्वलित ठेवले, तर बुद्धीच्या प्रत्येक कपाटातून अनेक जीवघेण्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात आणि त्याला ती मिळू लागली. जो माणूस सतत जगाला काहीतरी देत राहतो, त्याच्या सुखाची संपन्नता मात्र शब्दाच्या पलीकडची असते. मार्कांसाठी परीक्षा देणारे विद्यार्थी आणि आत्मचिंतनातून नवीन-नवीन शोध लावणारे विद्यार्थी यातला आत्मचिंतन करणारा विद्यार्थीच श्रेष्ठ ठरत जातो. डॉ. होमी भाभा ते डॉ. अब्दुल कलाम ही नावे आत्मचिंतनाच्या मार्गावरची आहेत. अशासारख्या अनेक अनेक महामानवांनी हे जग समृद्ध केले, ते केवळ बुद्धीचा वापर करूनच.