इस्लामने मानवकल्याणासाठीच नवा विचार मांडला...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 01:14 PM2020-04-25T13:14:37+5:302020-04-25T13:15:04+5:30
इस्लामचा उदय मानवी इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. इस्लामच्या स्थापनेमुळे जगात अनेक बदल घडले. अनेक अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरांना ...
इस्लामचा उदय मानवी इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. इस्लामच्या स्थापनेमुळे जगात अनेक बदल घडले. अनेक अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरांना इस्लामने मूठमाती दिली. इस्लामने मानवकल्याणासाठी नवा विचार मांडला. इस्लामच्या स्थापनेने ज्ञानाच्या नव्या संकल्पना समोर आल्या. हिरा नावाच्या गुहेत जिब्राईल (अ.) या देवदूताने ज्यावेळी मोहम्मद (स.) यांना अल्लाहने प्रेषितत्व बहाल केल्याची सुवार्ता दिली त्यावेळी जिब्राईल (अ.) यांनी उच्चारलेला पहिला शब्द ‘इकरा’ (वाचा) हा होता. ही इस्लाममधील अतिशय पवित्र घटना आहे. येथूनच इस्लामचा विचार पुन्हा जगासमोर आल्याचे मानले जाते.
जिब्राईल यांनी वाचा असा जो ईशसंदेश पहिल्यांदा प्रेषितांकडे आणला होत तो ज्ञानग्रहण करून अज्ञानापासून मुक्ती मिळवण्यासाठी अल्लाहकडून मिळालेला आदेश होता. मक्का शहरातील लोकांमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राविषयी अज्ञान पसरलेले होते, ते अत्यंत चुकीच्या मार्गाने जीवन जगत होते. रिबा ही व्याज घेऊन आर्थिक लूट माजवणारी व्यवस्था इस्लामपूर्व काळात मक्का शहरामध्ये प्रचलित होती. त्यामुळे मक्का शहरातील गरीब, श्रीमंत, व्यापारी, शेतकरी, मजूर, गुराखी सर्वांची लूट सुरू होती. लोक अनेकेश्वरवादाच्या चुकीच्या धारणांमध्ये गुरफटले गेले होते. प्रेषितांना हिरा गुहेत इसवी सन ६१० मध्ये प्रेषितत्व मिळाल्यानंतर तब्बल १३ वर्षे आपल्या जन्मस्थानी मक्का शहरात इस्लामचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी मक्केतील आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना आणि शहरवासीयांना चुकीच्या गोष्टींपासून रोखण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या, त्यांच्यावर हल्ले झाले. पण प्रेषितांनी अल्लाहच्या मार्गावर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
र्ईश्वराकडून ज्या ज्या वेळी संदेश आले त्या त्या वेळी ते समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेषितांनी प्रयत्न केले. त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले. त्यांना आपले प्रिय जन्मस्थान सोडून दुसºया शहरात स्थलांतरित व्हावे लागले. पण त्यांनी एकेश्वरवादाच्या प्रसारासाठी सुरू केलेली चळवळ थांबवली नाही. शहरातील श्रीमंत, व्यापारी, अमीर-उमरावांनी त्यांना अनेक आमिषे दाखवली. त्यांना सर्वकाही देण्याची तयारी दर्शवली. पण प्रेषित अल्लाहच्या मार्गावर ठाम राहिले. त्या मार्गावरून यत्किंचितही ढळले नाहीत.
प्रेषितांनी अल्लाहच्या अस्तित्वाविषयीची जागृती केली. त्यांनी अल्लाहकडून त्यांना जिब्राईल (अ.) यांच्याकरवी आलेली काही महत्त्वाची कर्तव्ये व उपासनांची पद्धत सांगितली. त्यांच्याकरवी आलेल्या संदेशापैकी तौहीद हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश होता. ईश्वर एक आहे. त्याच्याशिवाय कुणीही पूजनीय नाही. मुहम्मद (स.) हे त्याचे प्रेषित आहेत. हे संपूर्ण विश्व नष्ट होणार आहे. कयामत (महाप्रलय) दिनी प्रत्येक मानवाला त्याच्या जीवित कृत्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याने अल्लाहच्या आदेशानुसार आपले जीवन व्यतीत करावे, असा एकूण या संदेशाचा सार होता. त्यानंतर प्रेषितांकरवी (स.) अल्लाहने उपासनेचे प्रकार सांगितले. त्यामध्ये नमाज, रोजा, जकात आणि हज ही महत्त्वाची उपासना आहे.
इस्लामी उपासना पद्धतीत दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे प्रत्येक मुस्लिमांना अनिवार्य करण्यात आले आहे. ही नमाज अदा करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. नमाजानंतर रोजा या उपासनेला महत्त्वाची उपासना मानलेली आहे. पवित्र कुरआनात नमाजासाठी ‘सलात’ हा शब्द तर ‘रोजा’साठी सौम हा शब्द आला आहे. रोजा हा शब्द मूळ फारसी भाषेतील शब्द आहे. सौमसाठी पर्यायी शब्द म्हणून भारत, पाकिस्तान, इराण, बांग्लादेश, अफगाणिस्तानात वापरला जातो. त्यासाठी कुरआनने आदेश दिला आहे- इमानधारकांनो, जे विहित केले तुमच्यावर उपवास, जसे विहित केले होते तुमच्या पूर्वजांवर, जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल’ (कुरआन २/१८३)
जकात हे रोजानंतर महत्त्वाचे कर्तव्य आहे. ज्या व्यक्तीकडे साडेबावन्न तोळे चांदी अथवा साडेसात तोळे सोने किंवा तेवढ्या किमतीची नाणी किंवा नोटा किंवा कंपनी भागभांडवल असेल त्या व्यक्तीने जकात देणे इस्लामी कायद्यानुसार अनिवार्य आहे. पण ही संपत्ती एक वर्षापेक्षा अधिक काळ त्या व्यक्तीने संचित केलेली असावी. यानंतर महत्त्वाचे कर्तव्य हज हे आहे. ज्या मुस्लिमाची पात्रता आहे त्याने आपल्या आयुष्यात एकदा तरी मक्का शहराची ‘बकरी ईद’च्या काळात इस्लामी संहितेप्रमाणे तीर्थयात्रा करणे बंधनकारक आहे.
- आसिफ इक्बाल