नाती जपणे ही सुद्धा एक अप्रतिम '' साधना '' च
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 09:00 PM2019-04-13T21:00:12+5:302019-04-13T21:02:36+5:30
आई-वडील, पत्नी, मुले, भाऊ- बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते.
- डॉ. दत्ता कोहिनकर
आदित्य आमच्या ग्रुपमधला. सर्वांचा लाडका, समंजस, विनम्र, आध्यात्मिकतेची आवड असणारा. आदित्याला लग्नानंतर दहा वर्षांनी मुलगा झाला. अतिशय प्रेमळ जोडपं. मुलावर त्यांचं अतोनात प्रेम. मुलगा दोन वर्षांचा असताना, एके दिवशी आदित्यला कामावर जायला उशीर झाला. कंपनीची बस पकडण्याच्या घाईत घरातून बाहेर पडताना त्याच्या लक्षात आलं, की एका औषधाच्या बाटलीचं झाकण उघडं आहे. त्यानं बायकोला बाटलीचं झाकण लावून ती कपाटात ठेवण्यास सांगितलं.
बायको हो म्हणाली; पण घरातल्या कामामुळे ती विसरली. दुर्दैवाने त्यांचा मुलगा त्या बाटलीजवळ गेला व त्या बाटलीचा रंग आवडल्यामुळे खेळता खेळता त्याने ते सर्व औषध पिऊन टाकलं. ते मोठ्या माणसांचं औषध होतं. त्याची मात्रा कमी प्रमाणात घ्यावयाची होती. पूर्ण बाटली प्याल्यामुळे औषधाचा विषाप्रमाणे परिणाम झाला. बेशुद्ध झालेल्या त्या छकुल्याला घेऊन बायको दवाखान्यात गेली; पण तोवर ते मूल मृत झालं होतं. त्यामुळे ती हादरली. नवऱ्याला हे कसं सांगू? याला मीच जबाबदार आहे, या विचारांनी भ्रमिष्ट होऊन रडू लागली.
ही बातमी ऐकून उद्विग्न झालेला आदित्य दवाखान्यात आला. पत्नीपाशी बसून खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ह्यह्यआय लव्ह यू डार्लिंग - टेक केअर, नातेसंबंध जपण्याच्या बाबतीत आदित्य हुशार होता. मुलगा पुन्हा जिवंत होणार नव्हता. बायकोला अपराधी ठरवल्याने ती बेशुद्ध होण्याची शक्यता होती. ते तिचंही बाळ होतंच ना. याक्षणी आदित्यकडून तिला सहानुभूती व धीर हवा होता. त्यानं परिस्थिती ओळखून तिला धीर दिला. तिला प्रेमानं जवळ घेतलं.
नातेसंबंध टिकवण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. त्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन चिंतनाची गरज असते. संत कबीर म्हणतात, प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला. थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करुणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वाथार्चाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते. सफल प्रेम हे फळासारखे असते. ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो.
आई-वडील, पत्नी, मुले, भाऊ- बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते. अहंकाराला तिलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्याचा अधिकार देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले व एकमेकांना समजून घेतले, तर कुठलेही नाते अभंग राहील. रिश्ते और नाते बननेसे नही, माननेसे होते है म्हणून वडीलधाऱ्यांच्या आठवणींतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे नवरात्रौत्सव घरात साजरे करावे, पोरांच्या कल्लोळात कुरूक्षेत्रावर समतेत राहावे व सभोवतालच्या समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता आणि घरातील व घराबाहेरची माणसे सुखी होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. थोडक्यात घराचे घरपण राखता राखता भिंतीवरील त्या ओळींना न्याय द्यावा.
घर असावे- घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
परस्परांवर प्रेम असावे
नकोत नुसती नाती.