हा होईल दान पसावो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 03:58 AM2019-05-06T03:58:13+5:302019-05-06T03:58:45+5:30
ज्ञानोबाची वाणी मराठी भाषेला लाभलेली नवसंजीवनी आहे. भूमीचे मार्दन जसे नुकत्याच उगवलेल्या लवलवत्या अंकुराने सांगावे, तसे ज्ञानदेवांच्या वाणीची मार्दवता शालीनता आणि चारित्र्याची ही शीता ब्रह्मानंदाच्या कंदावर उचंबळलेला ज्ञानेश्वरी नावाचा अमृत घट करतो.
- प्रा. शिवाजीराव भुकेले
ज्ञानोबाची वाणी मराठी भाषेला लाभलेली नवसंजीवनी आहे. भूमीचे मार्दन जसे नुकत्याच उगवलेल्या लवलवत्या अंकुराने सांगावे, तसे ज्ञानदेवांच्या वाणीची मार्दवता शालीनता आणि चारित्र्याची ही शीता ब्रह्मानंदाच्या कंदावर उचंबळलेला ज्ञानेश्वरी नावाचा अमृत घट करतो. ज्ञानदेवांची निम्नभरलीया उणे, जों खाडांवया घाव घाली, स्फटीकगृहीचे दीप डोलतु जैसे असी शब्द संपदा पाहिली की वाटते, ज्ञानदेव हे केवळ तत्त्वदर्षी व क्रांतदर्शी द्रष्टे कवी नव्हते, तर ते मानवतेचे महाभाष्यकार होते. विश्वात्मक शक्तीला आवाहन करून झाल्यानंतर ज्ञानाची किरणे घराघरांत पोहोचावीत एवढीच ज्ञानेशांची माफक अपेक्षा, परंतु ही अपेक्षा किती लोकविलक्षण आहे. प्रसादाचे ‘पसाय’ जेव्हा पसाभर वैश्विक इच्छेपोटीचे दृश्य रूप म्हणून प्राप्त होते, तेव्हा ज्ञानेशांच्या मनीचा आनंदरूप पक्षीराज स्वानंदाच्या गगनी विहार करताना म्हणू लागतो.
किंबहुना सर्वसुखी। पूर्ण होवोनि तिन्ही लोकी
भजीजो आदि पुरुषी। अखंडित।
सर्वसुखी समाजाचे व समाजातील सर्व घटकांना आत्मिक सुखाच्या एका समेवर आणणारे ज्ञानदेवांनी रेखाटलेले हे प्रसादाच्या दानाचं शब्दशिल्प त्यांच्या हृदयातील गाभाऱ्याच्या निखळ प्रेमाचे द्योतक आहे. आपल्या रस्त्यात काटे पसरविणाºया दृष्ट-दुर्जनांच्या रस्त्यावरसुद्धा फुलांच्या पायघड्या अंथरण्यासाठी वैयक्तिक जीवन सुख-दु:खाच्या किनाºयाच्या पलीकडे जावे लागते, तरच साºया विश्वाचे आर्त मनी प्रकाशित होतात. प्रतिकुल आणि बिकट प्रसंगांमधून गेल्यानंतरही त्यांनी आपला सन्मार्ग कधीही सोडला नाही. माणसाच्या माणूसपणाची ध्वजा उंच-उंच फडकत राहावी आणि माणूस उत्तरोत्तर सुखी संपन्न व्हावा, म्हणून ज्ञानेश्वरीच्या पसायदानाच्या समाप्तीप्रीत्यर्थ हृदयात माणूसपणाची विचारधारा पेरणारी संसार शांताची सावली ज्ञानोबा माउली म्हणते,
तेथ म्हणे श्री विश्वेशरावों। हा होईल दान पसावों।
येणें वरे ज्ञानदेवों। सुखिया झाला।।
अनेकांनी ज्ञानदेवाना मोग्याची माउली, कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा, साधकांचा मायबाप, सर्वाभूती सुखरूप अशा उपमेंच्या कवेत बसविण्याचे काम केले आहे. कदाचित, ज्ञानोबा ज्यांना जसे भावले, तसे त्यांनी त्यांचे वर्णन केले आहे, पण ज्ञानदेव नावाच्या उपेक्षितांच्या म्होरक्याचे व्यक्तिमत्त्व या कुठल्याच उपमेंच्या कवेत बसणारे नाही. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची झालेली हेटाळणी, उपहास आणि छळ पाहता, त्यांच्या जागी सामान्य माणूस असता, तर त्याची प्रतिक्रिया कदाचित वेगळी आली असती. ती प्रतिक्रिया स्वाभाविक मानली गेली असती. मात्र, ज्या काळात फक्त पोथ्या-पुराणातील अक्षरांच्या काजवाड्यांना शास्त्री-पंडितांनी नको तेवढे महत्त्व दिले होते, त्या काळात आपल्या संजीवन समाधीच्या श्वासापर्यंत मानवतेचा ध्यास घेतलेल्या ज्ञानदेवांनी भक्ती, कर्म व ज्ञानाच्या माध्यमातूनसुद्धा मानवतेचंच गीत गायले. म्हणून मला वाटते की, असामान्य ज्ञानदेवास उपमाच द्यायची
झाली, तर मानवतेचे गीत गाणारा महाकवी एवढीच उपमा द्यावी.