ज्ञानमोचक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:25 AM2019-03-05T04:25:03+5:302019-03-05T04:25:09+5:30

मराठीचे आद्य गद्य लेखक म्हाइंभटाने स्वामींना एकदा प्रश्न विचारला, ज्ञानाचं काय लक्षण? स्वामींनी ‘ज्ञानमोचक’ हे सूत्र सांगून उत्तर दिलं.

Jnanmochak | ज्ञानमोचक

ज्ञानमोचक

Next

- बा.भो. शास्त्री
मराठीचे आद्य गद्य लेखक म्हाइंभटाने स्वामींना एकदा प्रश्न विचारला, ज्ञानाचं काय लक्षण? स्वामींनी ‘ज्ञानमोचक’ हे सूत्र सांगून उत्तर दिलं. जे अधीन, अज्ञान व अविद्या बंधनं तोडतं ते ज्ञान. हे त्याचं लक्षण आहे. या तीनच बंधनांत जग अडकलं आहे. जे दिसत नसतात पण असतात. प्रेम दिसत नाही पण बंधन असतं. धाक दिसत नाही पण बंधन असतं. कायदा दिसत नाही पण बंधन आहे. विकार दिसत नाही पण त्यांचा आपल्यावर ताबा असतो. तनाच्या, मनाच्या, जनाच्या, धनाच्या सर्वच अधीन असतात. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या ग.दि.मा.च्या काव्यात सुरेख वर्णन केलं आहे. जो शब्द लक्ष्याचं लक्षण सांगतो त्याला शास्त्रात लक्षण म्हणतात. सूत्रात मोचक या क्रियापदाने ज्ञानाचं लक्षण सांगितलं आहे. खरं तर, भटाला ज्ञानाचं लक्षण आधीच ठाऊक होतं. कारण स्वामींच्या पहिल्या भेटीत जो संवाद झाला. त्यात ‘ज्ञानउदयें मोक्षु’ असं त्यांनीच उत्तर दिलं आहे. पुन्हा ‘ज्ञानादेव तु कैवल्यं! ज्ञात्वादेवं मुच्यते सर्वपाशै:’ या वेद उपनिषदाने केलेल्या व्याख्या त्यांना माहिती होत्याच. गीतेने ज्ञानाचं विस्तारपूर्वक केलेलं विवेचनही त्यांना कळलं होतं. मग तोच प्रश्न पुन्हा का विचारला? तर, अधिकार वाणीतून ‘ज्ञानं मोचकं’ याचा मराठी अनुवाद त्यांना ऐकण्याची इच्छा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैखरीला परेचा स्पर्श व्हावा असं कुणाला वाटत नाही. हे सूत्र म्हणजे प्रकाशाचा पुंज आहे. सूत्रसृष्टीत तळपणारा तापहीन सूर्य आहे. अज्ञान व आशापाशांनी जखडलेल्या जीवांना मुक्तीमार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे. आणखी एका सूत्रात स्वामी ज्ञानाचं लक्षण सांगताना म्हणतात,
‘‘जे जैसे असे ते तैसे जाणिजे ते ज्ञान’’
यात स्वामींनी यथार्थ ज्ञानाचा परिचय करून दिला आहे. ज्ञान सत्य असतं, मिथ्या नसतं. जे जसं आहे ते तसंच जाणणं याचं नाव ज्ञान. ते आरशासारखं सत्य दाखवतं खोटं बोलत नाही. ते ज्ञान अग्नीसारखं निर्दोष, पाण्यासारखं निर्मळ व तलवारीसारखं धारदार आहे. गीतेने त्याला नौका व पवित्र म्हटलं आहे. ज्ञानाने कुणालाही कधीच फसवलं नाही. ज्ञानापासून साध्या लोकांना वंचित ठेवणारा वर्ग वेगळाच आहे. त्यांनीच अज्ञानाच्या अंधारात ठेवलं व मिथ्या ज्ञानाने आपल्या अनेक पिढ्या बरबाद केल्या. आम्ही माहितीला ज्ञान समजतो ती अचूक नसते. तिच्यावरचा विश्वास आंधळा असतो. देव भगताच्या अंगात येतो. कोंबडा, बकरा मागतो. कुणी अंगातल्या देवाला देवत्वाचा पुरावा मागत नाही. गाडगेबाबा कीर्तनात म्हणायचे, ‘‘असा कसा तुमचा देव, घेतो बकराचे जीव.’’ बळी घेणारा देव दयाळू कसा? शुद्ध बुद्ध देव घाणेरड्या देहात कसा? देव उदार. तो नारळ नैवेद्याची भीक कसा मागतो? तो धरतो म्हणे. तो पोलीस का लुटारू, ही तर खंडणी झाली. मुक्तीची भाषा करणारा व अडचणीत आणतो. देव कृपाळू मांसाहारी कसा? श्रद्धेला पुरावा लागतो, अंधश्रद्धा अफवेवर पोसली जाते. अफवा सोडणे हा अन्यथा ज्ञानाचा जोरात चालणारा धंदा आहे. पण असत्य हे कदापिही विज्ञानाच्या प्रयोगशाळेत टिकत नाही. ‘सत्यमेव’च जयते. स्वामी एक सुंदर गोष्ट सांगतात, दोन गुरुबंधूंना एक डुक्कर दिसलं, एक म्हणतो हा मोठा उंदीर आहे. दुसरा म्हणतो हत्तीचं लहान पिल्लू आहे. दोघांचा वाद होतो. सत्य कळावं म्हणून डुकराला गुरूकडे नेतात. आपलं मत सांगतात, गुरू म्हणतो, मी तुम्हाला एवढं ज्ञान दिलं, पण व्यर्थ. अरे हे डुक्कर नाही व हत्तीचं पिल्लूही नाही हा पक्षी आहे. स्वामी हसून म्हणतात, शिष्य जुळतंमिळतं बोलले, पण गुरूने असत्याची हद्द पार केली.

Web Title: Jnanmochak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.