आनंद तरंग; शरीराबाहेर अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 04:50 AM2019-05-04T04:50:19+5:302019-05-04T04:50:43+5:30
सुप्रसिद्ध विचारवंत हर्बट स्पेन्सर यांनी म्हटले आहे की, असे एक तत्त्व आहे की, जे सर्व जगातील माहिती तंत्रज्ञानाविरु द्ध असलेली एक सिद्धता आहे.
डॉ. मेहरा श्रीखंडे
सुप्रसिद्ध विचारवंत हर्बट स्पेन्सर यांनी म्हटले आहे की, असे एक तत्त्व आहे की, जे सर्व जगातील माहिती तंत्रज्ञानाविरु द्ध असलेली एक सिद्धता आहे. त्याचप्रमाणे, ते सगळ्या वादविवादांविरुद्धही आहे व ते माणसाला सदैव अज्ञानात राहू देत नाही. त्याचे नाव आहे तुच्छता आणि ते सर्व शोधांची पहिली पायरी आहे. शरीराबाहेर अनुभव हे ते अनुभव आहेत की, ज्याच्यात दुर्लभ गोष्टी असून, त्याच्यात मानवाचे चैतन्य शरीरातून वेगळे होऊन भौतिक जगतापलीकडे फिरून येते. आत्मा किंवा चैतन्य शरीराबाहेर जाताना शरीराबाहेरील एका विशिष्ट जागेवरून सर्व जग बघू शकतो व हे तो पाच कर्मेंद्रियांच्या अभावीही करू शकतो. हे प्रवास ज्याप्रमाणे सुखकर, आनंदी किंवा मोहक असतात. त्याचप्रमाणे, घाबरवणारेही असू शकतात. हे शरीराबाहेरील अनुभव ज्यांना सर्वसाधारणपणे ओ.बी.ई. म्हणतात, ते आश्चर्यकारकरीत्या नेहमी होतात व ते वेगेवगळ्या पद्धतीने निकाल देतात. काही परीक्षणे असे दर्शवितात की, वीस माणसांपैकी एकाला तरी हे ओ.बी.ई. आयुष्यात एकदा तरी येतात. डॉ. युजीन ई. बर्नाड ज्यांनी या बाबतीत संशोधन केले आहे, त्यांच्या मते शंभरामध्ये एकाला तरी त्याच्या आयुष्यात असे अनुभव येऊन जातात. ते जगातील सर्व भागात, त्यांच्या धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद यापासून लांब असून कुठल्याही वयाच्या व्यक्तींचे अनुभव आहेत. कित्येक भारतीय संतांना वैश्विक उत्थानाची शक्ती आहे. ध्यानावस्थेत असताना खूप दूरवर जाऊन ते दुसऱ्या माणसांना भौतिक अवस्थेत दर्शन देऊ शकतात व यालाच सिद्धी किंवा योगिक शक्ती म्हणतात. याबाबतीत पातंजलीच्या क्वयोगसूत्र या ग्रंथांत खूप संदर्भ आढळतात. ओ.बी.ई. पुरातन इजिप्शियन व ग्रीक संस्कृतीमध्येही जागोजागी आढळतात.