आनंद तरंग: अपूर्णत्वाची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 03:56 AM2019-07-24T03:56:45+5:302019-07-24T03:56:59+5:30
कुठेतरी तुम्हाला तुम्ही अपूर्ण आहात असे वाटते आहे. माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा अपूर्णत्वाची भावना तीव्र होईल केवळ तेव्हाच तुमच्या आयुष्यात काहीतरी भव्य घडावे याची ओढ तुम्हाला लागेल
सद्गुरू जग्गी वासुदेव
तुम्ही आत्ता, या क्षणी जे काही जाणता, जर त्याच्या पलीकडचं काही जाणून घ्यायचं असेल तर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की सध्या तुम्ही जे आहात, ते पुरेसे नाहीये ते जाणण्यासाठी. जोपर्यंत अपूर्णत्वाची भावना प्रखर होत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही मोठ्या गोष्टीचा शोध घेणार नाही; आणि तुमच्या त्या शोधात तेवढी तीव्रताही असणार नाही. आजकाल खूप लोक असे शिकवितात, स्वत:ला सांगा की मी खूप छान आहे, श्रेष्ठ आहे. तुमच्या मुलांना सांगा तू छान आहेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. कसलीही काळजी करू नका, सर्व ठीक आहे. असा विचार केल्यावर तुम्हाला असे वाटते की तुम्ही या जगाचे राजे आहात. हा केवळ मूर्खपणा आहे. हे म्हणजे तुमच्या मर्यादांना गौरवण्यासारखं आहे. सर्वप्रथम तुम्ही श्रेष्ठ आहात, हे तुम्हाला कुणी दुसऱ्याने किंवा तुम्ही स्वत:लासुद्धा तसे सांगण्याची गरजच काय? याचे कारण; कुठेतरी तुम्हाला तुम्ही अपूर्ण आहात असे वाटते आहे. माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा अपूर्णत्वाची भावना तीव्र होईल केवळ तेव्हाच तुमच्या आयुष्यात काहीतरी भव्य घडावे याची ओढ तुम्हाला लागेल. तुम्ही तुमचे अपूर्णत्व जर कोणत्या मुलाम्याखाली झाकले तर तुमच्यात कशाचीच ओढ निर्माण होणार नाही. सर्व काही सुरळीत चाललेले आहे असे तुम्ही स्वत:ला समजावत राहाल. याचा अर्थ असा नाही की सद्य:स्थितीतील जीवनाचा आनंद आपण उपभोगत नाही; पण हे परिपूर्णही नाही. आणि याची जाणीव झाल्यावरच तुम्हाला अधिक ओढ लागेल. बºयाच लोकांसाठी चहा, पोहे आयुष्यात सर्वोच्च संतुष्टी देणारी बाब आहे. तर केवळ जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आयुष्यात फक्त खाणं, पिणं, झोपणं हे पुरेसं नाही, यांसारख्या अनेक लहानसहान गोष्टी पुरेशा नाहीत; तेव्हाच तुम्हाला काहीतरी अधिक जाणून घेण्याची इच्छा होते; आणि केवळ तेव्हाच तुम्हाला जीवनाचे वेगळे पैलू जाणून घेण्याची तीव्र ओढ लागते.