आनंद तरंग : पाचवी कला...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 03:25 AM2020-02-21T03:25:27+5:302020-02-21T03:25:45+5:30
परिवाराला सुखी आणि काळजीमुक्त ठेवण्यासाठी पक्के नियोजन खूप महत्त्वाचे ठरते,
विजयराज बोधनकर
नियोजनाने मोठमोठे चमत्कार घडले आहेत. नियोजनामुळे अनेक सामान्य माणसे आकाशाइतकी मोठी झाली आहेत. गोष्ट कुठलीही असो पक्के नियोजन असेल तर उत्तम यश पदरी पडते. मग नियोजन म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. नियोजनासाठी पूर्णपणे बुद्धीचा वापर करावा लागतो, बारीकसारीक गोष्टींचा विचार करूनच मांडणी करावी लागते. घरात लग्न असो, नव्या व्यवसायाची सुरुवात करायची असो, दूर कुठे तरी प्रवासाला जायचे असो, गावात उत्सव असो, सरकारी योजना असो, शैक्षणिक योजना असो, असे अनेक विषय असो, यात नेमके धोके कुठे आहेत, नेमकी कुठली बाजू महत्त्वाची आहे, याला येणारा खर्च किती, मनुष्यबळाची काय तयारी करावी लागणार, नियमांची उजळणी किती करावी लागणार, आर्थिक पाठबळ कसे उभे करता येईल, दिनक्रमात वेळेचा सदुपयोग कसा करून घेता येईल, अशा अनेक गोष्टींचे चिंतन मनन करून त्याची डायरीत नोंद करून त्यावर अंमलबजावणी करणे म्हणजे नियोजन होय.
परिवाराला सुखी आणि काळजीमुक्त ठेवण्यासाठी पक्के नियोजन खूप महत्त्वाचे ठरते, ही एक मोठी कला आहे. मोठमोठी मॅनेजमेंटची कॉलेजे याचे शिक्षण देतात, व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियोजनाची कला खूप यश पदरात पाडून जाते, घरापासून ते देशाच्या कारभारापर्यंत नियोजनासाठी प्रत्येक व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे, दिवसभराचे, आठवड्याचे, महिनाभराचे आणि वर्षभराचे नियोजन करणारी व्यक्ती कधीही सैरभर न होता ठरविल्या मार्गाने आपल्या स्वप्नांचा प्रवास करीत राहते आणि अपयशापासून स्वत:ला वाचवत असते. आध्यात्मिक मार्ग आणि नियोजनाचा मार्ग एकच
आहे. ज्यामुळे बुद्धी स्थिर राहते आणि मन सकारात्मक विचार करण्यास सतत प्रवृत्त होत राहते. म्हणूनच नियोजनाला पाचवी कला आणि महत्त्वाची कला समजावी.