आनंद तरंग अंतरनिष्ठ तितुके तरले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 03:27 AM2020-01-14T03:27:53+5:302020-01-14T03:28:07+5:30
मुलांची वडिलांवर असलेली निष्ठा कमी झाली की घरात कलह सुरू होतो. भावाभावातलं प्रेम, निष्ठा कमी झाली की कोर्ट कचेऱ्या सुरू होतात.
स.भ. मोहनबुवा रामदासी
आपल्या अंतरंगात असलेल्या परमेश्वरावर, अगाध निष्ठा असावी. निष्ठा हा प्रतिष्ठेचा विषय होऊ नये, निष्ठा नसेल तर कुठलाच व्यवहार चालत नाही. मुलांची वडिलांवर असलेली निष्ठा कमी झाली की घरात कलह सुरू होतो. भावाभावातलं प्रेम, निष्ठा कमी झाली की कोर्ट कचेऱ्या सुरू होतात. बेबनाव वाढतच जातो. खटके कायम वाढत जातात. याच्या मुळाशी पैसा, संपत्ती आणि गर्व हीच प्रमुख कारणे असतात. हा व्यावहारिक अंतरनिष्ठेचा फक्त एक प्रकार झाला. असे अनेक प्रकार सांगता येतील, पण माझ्या दृष्टांताला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून मी व्यवहारातले दाखले थोडे कमी देत असतो. वरील वचनातून समर्थांना अंतरनिष्ठेबद्दल सांगायचे आहे. समर्थ म्हणतात, मूर्तिपूजेवर तुम्ही निष्ठा ठेवाल, पण चालत्या-बोलत्या माणसातला खरा आत्मरूपी (आत्माराम) ओळखण्यासाठी सगळे उपचार असतात. त्या आत्मारामावर निष्ठा, भाव, प्रेम, भक्ती असेल तरच साधक तरू शकेल. नाही तर बाह्याकारे भरंगळले लोकाचारे अशी अवस्था होईल. लोकाचार एकदा अंगात संचारला म्हणजे माणूस कावराबावरा होतो. लोकेशनासुद्धा मर्यादित असावी, अंतरंगात साधक जसजसा डोकवायला लागेल तसतसा त्याचा लोकाचार कमी होतो. समर्थांची लोकप्रियता खूपच होती, त्याचे यथोचित वर्णन केलेले आहे.
लोकांस पायाचा आदर। तेथे याचा अनादर। लोकांना समर्थांना केव्हा एकदा पाहीन असे व्हायचे, पण समर्थ त्याबाबत उदासीन असायचे, म्हणून त्यावर एक युक्ती करायचे ती अशी,
जातो स्थळ ते सांगेना। सांगितले तेथे जाईना। आपुले स्थिती अनुमाना। येवोच वेदी।
खनाळा मध्ये जाऊन राहे। तेथे सर्वत्रांची चिंता वाहे।
हे त्यांचे चरित्र वर्णन केलेले आहे. म्हणून परमार्थामध्ये अंतरनिष्ठेला अत्यंत महत्त्व आहे.