आनंद तरंग - मन : एक संग्रहालय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 02:45 AM2019-11-02T02:45:08+5:302019-11-02T02:45:30+5:30
आपल्या या जीवनात आपण जर जुन्या गोष्टींचा, प्रसंगाचा संग्रह करण्याऐवजी त्या प्रसंगांतून मिळालेली शिकवण जपून ठेवली तर त्याचा नक्कीच आपल्याला भावी जीवनात लाभ होऊ शकतो.
ब्रह्मकुमारी नीता
सर्व ब्रह्मवत्सांना संगमयुगावर मिळालेला हा नवीन जन्म, या जन्मात चांगले-वाईट जे काही आपण आपल्या मनाच्या तिजोरीत बंद करून ठेवले आहे त्याला ईश्वरचरणी स्वाहा करण्याची ही उत्तम वेळ आहे. या चंचल मनामध्ये जे काही साठवून ठेवले आहे, त्या सर्व गोष्टी, प्रसंग आपण काढून टाकत नाही तोपर्यंत शिवबाबाकडून जे रोज मुरलीद्वारे नवीन, निराळे ज्ञान मिळत आहे त्याचा संग्रह होऊ शकत नाही. आपल्या या जीवनात आपण जर जुन्या गोष्टींचा, प्रसंगाचा संग्रह करण्याऐवजी त्या प्रसंगांतून मिळालेली शिकवण जपून ठेवली तर त्याचा नक्कीच आपल्याला भावी जीवनात लाभ होऊ शकतो. पौराणिक काळातील अनेकानेक राजे जे शूरवीर होऊन गेले, त्यांच्या छोट्या-छोट्या वस्तू जसे चमचे, सुरी, बटणसुद्धा सांभाळून ठेवले जाते. शिवबाबा तर आपल्याला त्याच्याही आधीचा काळ स्मृतीत आणण्यासाठी रोज मुरलीमध्ये सत्ययुगी दुनियेचे वर्णन करीत असतात. आपण त्या प्रसंगांना आठवण्याचा प्रयत्न केला किंवा त्या सुखाचा अनुभव करण्याचा ध्यास घेतला तर नक्कीच आपले वर्तमान जीवन सुखी, समाधानी बनू शकेल. मनोवैज्ञानिकाच्या दृष्टीने आपल्या मनात दिवसभरात ३0 हजार किंवा त्याहूनही अधिक विचार येतात. थोडं थांबून जर त्याचे अवलोकन केले की माझे हे मन नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करण्यात व्यस्त आहे तर आढळून येईल की निरर्थक, नकारात्मक, प्रश्नार्थक विचारांच्या गोंधळात ते फसले आहे. कोणत्या मार्गाने जावे, काय करावे यांची गुंतागुंत दिसून येते. मनाची ही ओढाताण, अस्वस्थता जर थांबवायची असेल तर मनाला सद्विचारांनी भरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायला हवा. जसे एखाद्या फुलदाणीसाठी अतिशय सुंदर, रंगीबेरंगी, सुगंधी फुलांची निवड केली जाते तसेच आपण या मनातसुद्धा सुखद, सुंदर, समाधानी विचारांची निवड केली तर मन अतिशय शक्तिशाली झाल्याचे आपल्यास जाणवेल.