आनंद तरंग: मोक्षाचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 05:33 AM2020-03-13T05:33:55+5:302020-03-13T05:34:16+5:30
अज्ञानात चाचपडणारे त्या काळातले तीन वर्ण व स्त्रिया यांचा श्वास सूत्राने मोकळा केला. मोक्षाचा मार्ग प्रशस्त झाला. स्वत:च्या पंखांनी आभाळात झेप घ्यायचं बळ दिलं.
बा. भो. शास्त्री
श्रीकृष्णाने नरकासुराच्या कारागृहाचं भव्य कुलूप तोडून सर्व राजे आणि स्त्रियांना बंधमुक्त केलं. कारागृह मोठं होतं. दरवाजा पण अवजड होता. कुलूपही मोठं वा मजबूत होतं. पण ते लहान किल्लीने उघडतं. कुलूप व किल्लीच्या वजनात फार तफावत असते. हातोडी कुलुपाला तोडू शकते, पण कुलूप उघडत नाही. पण लहान आकाराची किल्ली कुलुपाला लीलया लागते आणि सहज उघडतेसुद्धा. असंच असतं सूत्र. दिव्याची लहान ज्योत खोलीभर अंधार नाहीसा करते.
अज्ञानात चाचपडणारे त्या काळातले तीन वर्ण व स्त्रिया यांचा श्वास सूत्राने मोकळा केला. मोक्षाचा मार्ग प्रशस्त झाला. स्वत:च्या पंखांनी आभाळात झेप घ्यायचं बळ दिलं. आपली जात खोटी, वर्ण खोटा. आपण सर्वच जीव आहोत, हे कळलं. भेदाभेदाच्या भिंती पडल्या. सूत्र आपलीच उंची आपल्याला सांगून गेलं. जीवा, तू लहान आणि शूद्र नाही. तू देवाचा अनमित्त बंधू आहेस. तू पापात्म. तूच पुण्यात्मा. तूच डाकू आणि तूच संत. तुला नरक होऊ शकतो. पण तुलाच मोक्षही मिळू शकतो. सगळेच गुणधर्म सगळ्यात आहेत. कुणी लहान कुणी मोठा नाही. ज्ञान ही कुणाची मक्तेदारी नाही. जीवाचं जीवन खरंच पाण्यासारखं आहे. ते उसात गेलं की गोड होतं. मिरचीला दिलं तर तिखट. कारल्याच्या वाफ्यात गेलं तर कडू होतं. त्याला स्वत:चा रंग नाही. ज्यात गेलं तसा त्याचा रंग होतो. असाच आहे हा जीव. त्याचं स्वरूप जसं मोठं तेवढंच सूक्ष्मही. सागरातलं पाणी अथांग दिसतं. डोळ्यातलं दिसत नाही. जमिनीतून नारळाकडे जाणाऱ्या पाण्याला पाइपलाइन नाही. मोटरपंप बसवला नाही. पाणी दिसत नाही. प्रत्येक नारळात शुद्ध आणि मधुर पाणी येतं कुठून? खोबºयाचं तेल होतं. लाडू होतात. बर्फी होते. कच्चं खाता येतं. भाजीत टाका. तसाच हा जीव आहे. अनुकूल आणि प्रतिकूल वेदनेचं दु:ख सर्वांना सारखंच असतं. देहाची बनावट ज्ञान आणि कर्मेंद्रिंये सर्वांचं सारखंच.