आनंद तरंग - शांतीचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 02:52 AM2019-11-05T02:52:30+5:302019-11-05T02:53:14+5:30
झोपेची गोळी आहे़, शांतीची नाही़ म्हणून जीवनाचं मोल कळावं
बा.भो. शास्त्री
शांती हेच जीवनमूल्य आहे़ विकारांचा विक्षेप विकल्पाचे हेलकावे थांबले की शांतीचा उदय होतो़ पण त्यात अहंकार हाच मोठा खोडा आहे़ तोच मनाला अस्थिर करतो, तेच तर अशांतीचं मूळ आहे़ संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
‘‘निश्चलत्वाची भावना
जरी नव्हैचि देखै मना
तरी शांती केवी अर्जुना
आपु होये’’
झोपेची गोळी आहे़, शांतीची नाही़ म्हणून जीवनाचं मोल कळावं व आपणच आपल्या जन्मी व जगण्यावर प्रेम करावं़ हेच कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलं, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.’ श्रीधर चक्रधरांनी मराठीच्या बीजातच हा सुंदर भाव ओतला आहे़ अहं वाईट नाही़ अहंत वाईट आहे़ तिचा परिवार मोठा आहे़ उपद्रवी आहे़ तृष्णा ही तिची लाडकी मुलगी आहे़ तीच जीवघेणी धावपळ करायला लावते़ व्यथित झालेला माणूस अशांत होतो़ अशांतीत मानसिक दु:ख व वेदना होतात़ अस्वस्थता वाढते़ मिळालेलं सुख भोगता येत नाही़ चित्त अस्थिर होतं़ मन दुबळं होतं, बुद्धीची क्षमता कमी होत जाते़ आत्मग्लानी येते़ जीवनातील उत्साह निघून जातो. राग आला की, भांडं आदळत, भांडण, चिडचिड कटकटी होतात़ अनेक समस्या निर्माण होतात़ आपण समस्येच्या मुळाशी न जाता भरकटतो़ शेवटी सुंदर जीवन अविवेकाने नष्ट करतो़ शांती केवळ क्रांती, शक्तीने, पैशाने मिळते ही आपली भ्रांती आहे़ पण हे सगळे प्रयोग फसले, असं इतिहास आपल्याला सांगतो़ परशुरामाने एकवीस वेळा युद्धात क्षत्रिय मारले़ कुठे शांती स्थापित झाली? बुद्धाने युद्धाशिवाय शांतीचा संदेश दिला़ प्रीती व भक्तीच्या शेतात शांती अंकुरित होते़ पण अहंतेला मुळातून उखडून फेकावे लागते.