आनंद तरंग: शक्तीचं स्मरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 04:24 AM2019-07-23T04:24:11+5:302019-07-23T04:24:27+5:30
श्लोक तरुणांनी पाठ करावा व त्यातला धीर मोहित होत नाही हे स्मरणात ठेवावं. शौर्यवृत्ती लढते, संकटात धीरवृत्ती शूराला विचलित होऊ देत नाही.
बा.भो. शास्त्री
शौर्याशिवाय धैर्य व धैर्याशिवाय शौर्य अपंग आहे. शौर्य जवळ असून अर्जुनासारखा वीर धनुर्धर रडत होता. म्हणून श्रीकृष्णाने त्याला गीतेत मंत्र दिला.
‘‘देहिनोस्न्यथा देहे
कौमार योवनं जरा
तथा देहान्तरप्राप्तिर्
धीरस्तत्र न मुह्यति’’
हा श्लोक तरुणांनी पाठ करावा व त्यातला धीर मोहित होत नाही हे स्मरणात ठेवावं. शौर्यवृत्ती लढते, संकटात धीरवृत्ती शूराला विचलित होऊ देत नाही. आपला नेमका धीरच खचलेला असतो. आपण घाई करतो, दम निघत नाही. गाड्यांचे अपघात हे धीर नसल्याने होतात, ओव्हरटेक करताना होतात. आपण दमच धरत नाही. घरात घरातली भांडणं, समाजातल्या समस्या अधीर मनामुळे होतात. चहात साखर कमी-जास्त झाली की भांडणाचं कारण कलहाला पुरेसं होतं. मन स्फोटक झालं आहे. काही लोक अभिमानाने म्हणतात, ‘‘मेरी गाली और गोली साथ साथ चलती है.’’ का रे बाबा, जरा धीर धर ना! त्याच्यात किंवा तुझ्यात बदल होण्याची वाट पाहा. धीर धरून संवाद कर, चर्चा कर, समस्या मिटेल. शिष्टाई नेहमीच फसत नसते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची माती करायला निघालेल्या रामेश्वरभटाचा संत तुकाराम महाराजांनी धैर्याने विरोध सहन केला. शेवटी त्यांच्यावर आरती त्यानेच लिहिली. कसोटीला उतरण्यासाठी देवाच्या मूर्तीला व दवाखान्यातल्या पेशंटलाही धीर धरावाच लागतो. स्वामींनी आचार्यांना गीतेचं पारायण सांगितलं नाही, नवस करायला सांगितलं नाही, वैद्याकडे नेलं नाही तर हृदयातच झोपलेल्या धीरत्व व वीरत्वाला जागं केलं. अंधश्रद्धेला त्यांनी कधीच खतपाणी घातलं नाही. ते माणसातील सुप्त गुणांना जागवत राहिले. आपल्याच विसरलेल्या शक्तीचं स्वामी स्मरण करून देत होते.