ज्ञानाची अडगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:48 AM2018-01-10T02:48:24+5:302018-01-10T02:49:07+5:30

परमेश्वराने एक बरे केले आहे. गेल्यानंतर बरोबर काही न्यायची सोय ठेवली नाही. एकट्याने यायचे-एकट्याने जायचे. जगताना माझे माझे म्हणायचे. वरती सोबत काहीच नेता येत नाही. सारे इथेच सोडून जायचे.

Junk of knowledge | ज्ञानाची अडगळ

ज्ञानाची अडगळ

Next

- डॉ. गोविंद काळे

परमेश्वराने एक बरे केले आहे. गेल्यानंतर बरोबर काही न्यायची सोय ठेवली नाही. एकट्याने यायचे-एकट्याने जायचे. जगताना माझे माझे म्हणायचे. वरती सोबत काहीच नेता येत नाही. सारे इथेच सोडून जायचे. अनेक विद्वानांची विद्वान मुले भल्यामोठ्या पगारावर परदेशी नोकरी करतात. पुढेमागे तेथेच स्थायिक होणे पसंद करतात. सुरुवातीच्या काळात वर्षाकाठी चक्कर पुढेपुढे हा कालावधी वाढत जातो. देवकार्य, मंगल कार्याला सोडाच अग्नि द्यायलासुद्धा ती वेळेवर पोहचू शकत नाही. रक्ताचे नाते सांभाळणे कठीण तेथे ऋणानुबंध कसे जोपासले जाणार? आयुष्यभर खस्ता खाऊन उभे केलेले घर. बंगला याला कोणी वाली उरत नाही. कोण सांभाळणार? विकणे हा एकमेव पर्याय. आलेली रक्कम वाटून घेणे एवढेच हाती. संपत्तीची वाटणी करणे सोपे जाते. परंतु प्राणपणाने जोपासलेल्या ग्रंथसंग्रहाचे काय? लक्ष्मी सर्वांनाच हवी. तिच्यावर साºयांचाच अधिकार शारदा कोणालाच नको. शारदेच्या वाट्याला अडगळ.
दोघेही प्राध्यापक. त्यांचा ग्रंथसंग्रह मोठा होता दोन वर्षांच्या अंतरात मागे पुढे दोघेही गेले. मुलाने फर्निचर अनाथाश्रमाला दिले. फ्रीज, वॉशिंगमशीन शेजा-यांना देऊन टाकले. ग्रंथसंपदा शिल्लक. त्याला कोणी वाली उरला नाही. शेजारी पाजारी म्हणाले, पुस्तक नको. वाचणार कोण? परमार्थ आणि संतसाहित्याची पुस्तके वाचणार तरी कोण? आम्हाला कपाटे दिली तरी चालतील.
ग्रंथांना वाली कोणी नाही. विचारांचा वाली कोणी नाही. अध्यात्म फुलणार कसे? सत्कर्माला बहर येणार तरी कसा? तक्षशिला, नालंदा यासारखी विश्वविख्यात विद्यापीठे जगाला देणाºया भारतात सरस्वतीपूजन एक दिवसापुरते सीमित झाले आहे. ‘सा मां पातु सरस्वती’’ अशी नित्य प्रार्थना करणारे सरस्वतीचे उपासक दुर्मीळच झाले आहेत. हे लक्षण राष्ट्रहिताचे नाही. परमार्थ काही वाटेवर सापडत नाही. सोन्याची नगरी लंका जिंकणा-या प्रभू रामचंद्रालाही समाधान वाटत नव्हते. त्यावेळी ज्ञानर्षी वशिष्ठ सांगते झाले, उपदेश करते झाले.
‘‘साधुसंगम सत्शास्र परो भवसि राम चेत्
तद्वीनै: नो मासै : परमं पदम् प्रान्पोशि।।
सज्जनांचा सहवास आणि सत्शास्रांचे स्तवन या दोन मार्गानीच मनुष्य जन्माचा उद्धार होतो. बाबा, महाराज, पावलोपावली भेटतात. साधूदर्शन दुर्मीळ. पुस्तकांची अडगळ, सत्शास्राचे स्तवन करायचे तरी कोणी? आणि कसे?

Web Title: Junk of knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.