कर्म हे निष्काम स्वरुपाचे असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:44 AM2019-06-15T11:44:20+5:302019-06-15T11:51:03+5:30
आपल्या हातून असे कार्य घडणे गरजेचे आहे. जे निष्काम स्वरुपाचे असावे.
- डॉ. भालचंद्र ना. संगनवार
कामे सर्वचि मूल्यवान । त्यांची योग्यता समसमान ।।
श्रीकृष्ण सिद्धे केले उचच्छिष्टे काढून । ओढिले ढोरे विठ्ठले ।।
केल्या जाणाऱ्या सर्व विकासोन्मुख कामांची योग्यता सामाजिकदृष्ट्या सारखीच असून, विकास कामात त्यांचा वाटा हा कमी किंवा जास्त नसतो, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामविकासाचे महत्त्व सांगताना नमूद करतात. कोणीही सर्व विद्या आत्मसात करीत नाही, परिस्थितीनुसार व श्रमपरत्वे माणूस कला अवगत करतो. जो तिन्ही जगाचा स्वामी, ब्रह्मांड रचेता, पांडवांचे सारथ्य करतो, ही देखील मानवी रुपात महानता आहे.
एकदा का एखाद्या कार्यास स्वत:हून वाहून घेतले की, त्यात समर्पणाची भावना ओतप्रोत भरलेली असावी. स्वत:च्या विकासासाठी आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी आपल्या वाट्याला आलेली कामे तन्मयतेने, सचोटीने व कार्यकुशलतेने करणे म्हणजेच राष्ट्रभक्ती आहे. कार्य ही परंपरा नसून, ध्येय असावे लागते. बहुतांश वेळेस कामे न करताच श्रेयवादात माणसे अडकतात आणि नामोहरम होतात. काम करीत राहणे व फळाची अपेक्षा करू नये, असे असताना देखील काम न करता फलप्राप्ती कशी होईल, ही प्रवृत्ती बळावत आहे. काम न करिता, दाम, नाम आणि पदाची अपेक्षा या विकृती बळावल्या आहेतच. प्रत्येक क्षेत्रात आत्मचिंतन होण्याची गरज असून, कर्म हीच पूजा आहे. यांचा विचार ठासून रुजविण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
खरे नाम विष्काम ही ग्रामसेवा ।
झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा ।।
कळो हे वळो देह कार्यी पडू दे ।
घडू दे प्रभो एवढे घडू दे ।।
कार्यसक्ती कशी असावी, याचे हे ज्वलंत भाष्य आहे. आपल्या हातून असे कार्य घडणे गरजेचे आहे. जे निष्काम स्वरुपाचे असावे. आपण जिथे वावरतो तिथे स्वर्गासम भास झाला पाहिजे, असे मागणे काय असावे तर मरावे परी कीर्तिरुपी उरावे, पण असे घडताना दिसते का, याचा फार विचार करण्याची गरज नाही. कारण निष्काम कर्म ही संकल्पना अत्यंत विरळ झाली आहे. व्यक्ती कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहे. कर्म फळ, संबंध, नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, यालाच कर्मवादाचा सिद्धांत म्हणतात.
संत मीराबाई, सूरदास, कबीर आदींनी कर्माची धारणा सुस्पष्ट करीत असताना ‘कर्म गती टारे नही टरै । जो जस करे, सो फल चाखा ।।' असे सांगितले आहेच. कर्माची व फळाची प्राप्ती एकाचवेळी शक्य नसते. अर्थात दोहोत खूप अंतर असते. कर्मावस्थेत कर्ता आणि फळास्थेत भोक्ता असे असेल तर कर्मावस्थेतील कर्त्यास त्याची फलप्राप्ती होत नाही. जर कर्म करणारा फलप्राप्ती वेळ बदलला तर फलप्राप्तीचा उपभोक्ता कोण, अशा परिस्थितीत दोन दोष निर्माण होण्याची शक्यता असते. एक क्रोतप्रणाश म्हणजे केलेले कर्म नष्ट होणे आणि दुसरे अक्रुताभ्यूगम म्हणजे अक्रत कर्माचे फळ यावरून असे स्पष्टपणे जाणवते की, कर्मफळ हे निश्चित प्राप्त होतेच. आजच्या कालावधीत कर्मनिष्ठा आणि श्रमप्रतिष्ठा आवश्यक झाल्या आहेत. ज्यांच्याकडे या गोष्टी आढळतात, त्यांच्या हातून मानवकल्याण होणे शक्य आहे. म्हणूनच प्रार्थना केली आहे की,‘तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वामाझी या योगे'
(लेखक हे लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भू-वैज्ञानिक आहेत )