कर्म म्हणजे शरीर, तर धर्म म्हणजे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 01:17 PM2019-06-24T13:17:55+5:302019-06-24T13:18:53+5:30
शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये जो व्यवहार होतो त्याला काही लोक धर्म समजतात.
- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
ज्या तत्त्वाच्या अभावामुळे जीवन छिन्न-विछिन्न होते असे मूलभूत तत्त्व म्हणजे धर्म असे आपण समजतो. धर्माचे मुख्य स्वरूप सूक्ष्म आहे. त्यामध्ये कर्म शरीर व धर्म म्हणजे प्राण हीच आपली भावना असते. शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये जो व्यवहार होतो त्याला काही लोक धर्म समजतात. खरं म्हणजे समाजाला त्याच्या आजच्या स्थितीतून आदर्शाकडे घेऊन जाणारा जो विचार आहे तोच धर्मविचार होय. ज्याप्रमाणे कान, डोळे, नाक इत्यादी इंद्रियांच्याद्वारे ‘मन’च निरनिराळ्या रीतीने प्रकट होते त्याप्रमाणे मनुष्याच्या प्रकृतीनुसार त्याचा धर्म दिसून येतो. आपण व्यवहाराच्या सर्व शाखांशी धर्माचा संबंध जोडतो. त्यामुळे धर्म आणि व्यवहार यांचा संबंध अमोघ राहिला पाहिजे. खरं म्हणजे माझा धर्म कोणता हे कोण्या शास्त्राकाराची किंवा धर्मग्रंथात शोधायची गरज नाही. मनुष्याला स्वयंभूरीत्या समजून येणारी ती गोष्ट आहे.
सहजत्स्फूर्त मानवधर्म विकसित झाला पाहिजे. मनुष्याने मानवधर्माला सोडले नाही पाहिजे. एका विशिष्ट चौकटीत धर्माला स्थान नको. ते विश्वव्यापक स्वरूपाने समाजासमोर मांडले पाहिजे. श्रद्धा, प्रेम-सत्य व त्याग असा रीतीने धर्म समजून घेतला जावा. माणसा-माणसांत विखुरलेल्या समाजाला एकसंघ बनविण्यात धर्माची मदत झाली पाहिजे. मनुष्याला अध्यात्माकडे घेऊन जाणारा धर्म आहे. धर्म आणि अध्यात्म एकाच वस्तूकडे जातात. धर्माचे स्वरूप वेगवेगळे असू शकते; परंतु अध्यात्म एकच असते. अध्यात्माशिवाय शांती नाही. ते एकतत्त्वाला धरत असते. ईश्वरतत्त्वाला जाणायचे असेल तर अध्यात्माशी एकरूप व्हा. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहून, अध्यात्म जगले पाहिजे. अध्यात्म जगणारा माणूस गौण-मुख्य यापासून निराळा असतो. तो विवेकाला धरून आपले कार्य करीत असतो. अध्यात्म जगताना ज्या अनुभूती येतात त्या पवित्र असतात. त्या अध्यात्म जगणाऱ्याच्या जीवनात प्रकटतात. तो अनुभव प्रकट करण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत असते. त्यातूनच त्याचा खरा धर्म कळतो. धर्मानुसारच मग त्याला त्याचे फळ मिळते. मन समाधानात रमून जाते.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आणि सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत.)