कर्मवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 06:15 AM2018-10-29T06:15:35+5:302018-10-29T06:17:43+5:30
भारतीय संस्कृती पलायनवादाचा विरोध करते. कर्मापासून पळणे किंवा त्यास टाळणे भारतीय संस्कृतीमध्ये प्रतिबंधित आहे.
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय
कर्म हे मानवाच्या जीवनाचे मूळ आहे. याच कर्मामुळे हे जग संचालित होत असते. आपले व्यक्तिगत जीवन जे काही आहे, ते या कर्माच्या कारणास्तव आहे. हे सारे व्यक्तिगत कर्म मिळून सामूहिक कर्म बनले गेले आहे. म्हणजेच शास्त्रांमध्ये या जगास कर्मप्रधान म्हटले गेले आहे. रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी म्हटले आहे -
‘कर्मप्रधान विश्व रची राखा’
व्यक्ती आणि समाजाचे भाग्य हे कर्मावरच अवलंबून आहे. सत्कर्मामुळे भरभराट आणि दुष्कर्मामुळे अधोगती अथवा पतन हे कारण आहे. जेव्हा आपण व्यक्ती, समाज अथवा देशाच्या संरचनेवर दृष्टिक्षेप टाकतो, तेव्हा आपणास त्या संरचनेमध्ये त्या व्यक्ती, समाज आणि देशाचे कर्म दिसून येते.
हेच कारण आहे की, भारतीय संस्कृती पलायनवादाचा विरोध करते. कर्मापासून पळणे किंवा त्यास टाळणे भारतीय संस्कृतीमध्ये प्रतिबंधित आहे. कर्म कितीही वेदनादायक असले तरी त्याचे संपादन करणे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. जेव्हा आम्ही कर्माचा त्याग करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये एक पोकळी निर्माण होते, तसेच ती पोकळी आमच्या जीवनात वेदनादायक समस्यांना जन्म देते. आम्ही समस्यांना दूर करण्याकरिता ज्या कर्मांचा त्याग करतो त्यामुळे समस्या वाढतच जातात आणि त्यानंतर त्या समस्यांचा सामना करणे आणखी कठीण होत जाते.
श्रीमद्भगवद्गीता ही कर्मवादाच्या सिद्धांताचे उत्तम उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनासोबतचा संवाद ही एक अद्भुत घटना आहे. कर्मवादापासून दूर पळणाऱ्या अर्जुनास निश्चित कार्यास लावणे हा या संवादाचा उद्देश होता. मानसिकरीत्या पूर्णत: खचलेल्या व्यक्तीस भगवान श्रीकृष्णाने अनेक उदाहरणे आणि प्रसंगांच्या माध्यमातून कर्माकरिता प्रेरित केलेले आहे.
श्रीमद्भगवद्गीतेमधील तत्त्वज्ञानासोबत भगवान श्रीकृष्णाने कर्माच्या बाबतीत जे एक उदाहरण दिलेले आहे, ते उपयुक्त आणि प्रशंसनीय आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास म्हटले की, मी पूर्ण आहे, मला कुठल्याच गोष्टींची आवश्यकता नाही, तरीही मी कर्म करतो कारण जर मी कर्म करणार नाही तर मला बघून लोकसुद्धा कर्म करणार नाही आणि समाजव्यवस्था विस्कळीत होईल. म्हणजेच कर्म हे मानवाच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. हेच कारण आहे की संसारातून मुक्त झाल्यानंतरसुद्धा भगवान बुद्धांनी कर्म करणे सोडले नाही.