कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:54 PM2019-04-12T17:54:53+5:302019-04-12T17:56:31+5:30

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड) प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे पण भाग्य लागतेच कारण कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते. याचा ...

Karma's result will get only with luck...! | कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते...!

कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते...!

googlenewsNext

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे पण भाग्य लागतेच कारण कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते. याचा अर्थ असा नाही की, प्रयत्नाला काही अर्थ नाही. प्रयत्न तर करायलाच पाहिजे. माठ मातीपासून घडत असला तरी, मातीवर कुंभाराला आकार द्यावाच लागतो. माऊली म्हणतात -
भाग्य जै सानुकूल । केले उद्यम सदा सफळ ॥
संत म्हणतात, भाग्याची अनुकूलता असेल तर प्रयत्नाला फळ प्राप्त होते. विचार करा दोघेजण जिवश्च कंठश्च मित्र आहेत. दोघांनी एकाच दिवशी व्यवसाय सुरू केला पण एकाला त्या व्यवसायात भरपूर फलप्राप्ती झाली व दुसरा मात्र पार उद्ध्वस्त झाला, असे का..? ज्याची भरभराट झाली त्याचे दैव अनुकूल होते व ज्याचे दिवाळे निघाले त्याचे दैव प्रतिकूल होते. थोडक्यात काय तर, प्रयत्नाला देखील दैवाची अनुकूलता लागतेच. संत तुकोबा म्हणतात -
प्रारब्धेची जोडे धन । प्रारब्धेची वाढे मान ॥
आपला विषय भाग्य प्रपंचात ही लागते व परमार्थात ही लागतेच परंतु प्रपंचातल्या भाग्याची कल्पना वेगळी व परमार्थातल्या भाग्याची कल्पना वेगळी. प्रपंचात ज्याच्याजवळ भरपूर श्रीमंती, बंगला, गाडी, जमीन जुमला, पदप्रतिष्ठा, मानमरातब असेल त्याला समाज भाग्यवंत समजतो पण परमार्थातील भाग्याचा विचार करतांना संत म्हणतात -
भाग्यवंत म्हणू तया । शरण गेले पंढरी राया ॥
भगवंत प्राप्तीसाठी जे साधना करतात, त्याला संत भाग्यवंत म्हणतात. पंढरीनाथाला जे अनन्य भावाने शरण गेले ते खरंच भाग्यवंत. संसारातल्या लौकिक पदार्थाच्या प्राप्तीसाठी साधना करणं आणि तो पदार्थ प्राप्त होणं हे संसारिकासाठी भाग्य आहे. तसं देव प्राप्तीसाठी साधना करणं आण िदेव प्राप्त होणं हे परमार्थिकासाठी भाग्य आहे.
एकनाथ महाराज म्हणाले -
भरतखंडी नरदेह प्राप्ती । हे तो परम भाग्याची संपत्ती ॥

भारतवर्षांत नरदेह मिळाला हेच परम भाग्य आहे. नरदेह मिळाल्यानंतर अध्यात्मिक साधना करून देव मिळवला हे आणखी दुसरे भाग्य कारण परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान इतर देहांत नाहीच म्हणून तर तुकोबा म्हणतात - 
भाग्यवंत म्हणू तया । शरण गेले पंढरी राया ॥
बाकीच्या देहांत देखील आहार, निद्रा, भय, आणि मैथून या क्रि या आहेतच. विषय सुखाचा विचार इतर देहात आहेच. फक्त उध्दाराचे ज्ञान इतर देहांत नाही ते फक्त याच देहात आहे. परमभाग्याने हा मानव देह मिळाला आहे तर, विषय सुखाच्या मागे न लागता परमात्मा स्वरूपाशी तदरु प होणं ह्यालाच संत भाग्यवंत म्हणतात. माऊली म्हणतात - 
हे तो विषय वैराग्य । आत्मलाभाचे भाग्य ॥

( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, मोबाईल क्र. -  9421344960 )

Web Title: Karma's result will get only with luck...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.