मन शुद्ध ठेवा, मग आपोआप सर्वसिद्ध होईल...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:02 PM2018-09-10T13:02:29+5:302018-09-10T13:03:09+5:30
मन हे इंद्रिय सर्वात चंचल आणि चपळ आहे; पण एकदा का ह्या मनाला स्थिर केले की आत्मानंदाची प्राप्ती होते. मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत.
- डॉ. तुळशीदास गुट्टे
मन हे इंद्रिय सर्वात चंचल आणि चपळ आहे; पण एकदा का ह्या मनाला स्थिर केले की आत्मानंदाची प्राप्ती होते. मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत. त्यात ध्यान, योग, आराधना या सर्व उपाययोजना मनाला शांत करण्यासाठी आहेत. मनात अनेक वेळेला अनेक विचारांचा गुंता असतो. तो गुंता काही वेळेला वाढतच जातो. त्या गुंतलेल्या मनाला स्थिरावण्याची गरज भासते. कारण, मनाची शक्ती अफाट आहे. मनाची सूक्ष्मशक्ती मनासोबत सतत भ्रमंती करीत असते. प्रत्यक्ष व्यवहारात या शक्तीची जाणीव आपल्याला व इतरांनाही होते. कारण, आपल्या आतील एक मन आणि बाहेरचं एक मन हे वेगळे नसतात. ते एकच आहेत. तरीपण आपल्या आतल्या मनासोबतच शांतपणे, सहजपणे असतो. बाहेरील मन सतत अविचार करीत असते. अविचारी मन हिंसेला जन्म देते. हिंसा ही मानवी प्रवृत्तीला घातक ठरते. मानवी मनाला सुंदर करण्यासाठी योग्य त्या गोष्टींचा स्वीकार करणे महत्त्वाचे ठरते. आपले जीवन परिचित, नियमबद्ध करावे. त्यातून आत्मानंदाची प्राप्ती होते. व्यक्तीने प्रयत्नपूर्वक ‘योग्य’ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मन-बुद्धी आणि शरीर यांचा संयोग साधून मानवी जीवनाचे कल्याण करून घ्यावे. निरामय आनंद उपभोगताना मग आकाशात आकाश मिसळल्याप्रमाणे येणारा अनुभव शब्दांत व्यक्त करता येत नाही. आत्मचैतन्यासाठी विश्वचैतन्याशी जी समरसता साधता येते तो अनुभव सर्वश्रेष्ठ असतो. त्यातूनच उत्तम प्रकारची सिद्धता प्राप्त करता येते. म्हणूनच आत्मानुभव प्राप्तीचे कर्म, भक्ती आणि ज्ञान अशा तीनही मार्गांचा अवलंब श्रीमद्भगवतगीतेत आला आहे. ज्ञानेश्वरांनी तर आपल्या भावार्थ दीपिकेत ज्ञानी, पंडित, आत्मानुभवी, संत-महंत, मुमुक्षू आणि सामान्यजन ह्यांना गीतेतील गुह्यगौप्य अर्थाचे स्पष्टीकरण दिले. या सर्व गोष्टींना कारणीभूत ‘मन’ आणि मनावर सर्वस्वी अवलंबून आहे. मनाला शुद्ध ठेवा, मग आपोआप सर्वसिद्ध होईल.
(लेखक हे श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)