एकाग्रतेची गुरूकिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 01:13 AM2019-10-09T01:13:32+5:302019-10-09T01:13:52+5:30
तुम्ही एखाद्या गोष्टीत खोलवर समरस झालात, तर लक्ष आपोआप केंद्रित होते.
- सद्गुरू जग्गी वासुदेव
मी योगक्रियांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी धडपडत आहे. त्यात सुधारणा झाली आहे, परंतु सर्व शक्तिनिशी लक्ष केंद्रित करून, समाधीच्या गहन अवस्थेचा अनुभव कसा घ्यावा, याविषयी आपण मला सांगू शकाल का, असा सवाल कुणीतरी मला केला. मी म्हणालो, लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्या तरी गोष्टीत स्वत:ला गुंतवून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या गोष्टीत खोलवर समरस झालात, तर लक्ष आपोआप केंद्रित होते. ज्या ठिकाणी मनापासून सहभाग नसतो, तिथे तुम्ही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलात, तर तो एक छळ होईल; एकाग्रता साधता येणार नाही. उदाहरणार्थ, बहुतांश मुलांना त्यांची पाठ्यपुस्तके म्हणजे एक प्रकारचा छळ वाटतो. त्यात लिहिलेल्या गोष्टी रंगतदार नसतात, म्हणून नाही. कित्येक विलक्षण गोष्टी एका लहानशा पाठ्यपुस्तकात लिहिलेल्या असतात, पण त्या कदाचित निरसतेने लिहिल्या गेल्या असतील. ते ज्या पद्धतीने सादर केले आहे, केवळ त्यामुळे असे घडते. जर तुम्ही मुलांना एखाद्या गोष्टीत गुंतवून ठेवलेत, तर तुम्हाला त्यांचे लक्ष केंद्रित करण्याविषयी काळजी करावी लागणार नाही. ते सदैव एकाग्र राहू शकतील. तुमच्या बाबतीतही हेच लागू पडते. एखाद्या गोष्टीत सहभागी न होता आणि गुंतवून न घेता, तुम्ही जर तुमचे मानसिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलात, तर त्यामुळे केवळ तुमचा छळच होईल, स्वास्थ्य लाभणार नाही. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष द्यायचा प्रयत्न करत आहात, तिथे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यावर तुमचे प्रेम जडायला हवे. हे मी अनेक वेळा सांगितले आहे, पण कदाचित तुमचे तिथे लक्ष नव्हते. तुम्ही केवळ एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडणे आवश्यक आहे. तुम्ही जर तुमच्या बुद्धीला चालना दिलीत, तर तुम्ही इच्छित अशा कोणत्याही गोष्टीच्या प्रेमात पडू शकता, हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर लक्ष केंद्रित करणे आपोआप होईल.