अज्ञान चुकीचं कळतं ते मिथ्याज्ञान व यथार्थ कळतं ते ज्ञान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:14 AM2019-02-05T06:14:40+5:302019-02-05T06:14:56+5:30
‘‘जे जैसे असे ते तैसे जाणिजे ते ज्ञान’’ ही स्वामींनी ज्ञानाची व्याख्या केली आहे. विषयाचं काहीच कळत नाही. ते अज्ञान चुकीचं कळतं ते मिथ्याज्ञान व यथार्थ कळतं ते ज्ञान.
- बा.भो. शास्त्री
‘‘जे जैसे असे ते तैसे जाणिजे ते ज्ञान’’
ही स्वामींनी ज्ञानाची व्याख्या केली आहे. विषयाचं काहीच कळत नाही. ते अज्ञान चुकीचं कळतं ते मिथ्याज्ञान व यथार्थ कळतं ते ज्ञान. ते भौतिक व आध्यात्मिक दोन प्रकारचं असतं. ते वस्तूला प्रकाशित करतं. म्हणून त्याला ज्ञानाचा दिवा म्हणतात. शब्दब्रह्म त्याचा विस्तार करू शकत नाही इतकं ते अथांग आहे. ते पापाला जाळतं, मूलद्रव्याचा परिचय करवून देतं. गीता म्हणते, ‘‘नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्येते.’’
जगात ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही. म्हणून तर जगाने ज्ञानाची पूजा बांधली. मिथ्या ज्ञानामुळे किती अडचणी येतात. हे आपण नेहमीच अनुभवत आहोत. आपले अंदाज चुकतात. व्यवहारात आणि परमार्थात सतत फसगत होते. मित्र, सोयरे, वैद्य, सुशिक्षित, धनिक असतात. वेगळे दिसतात. कधी चांगल्याबद्दलही गैरसमज होतो. कारण आपण विवेकाने मुळाशी जात नाही. झाडाच्या फांदीवर घर करणाऱ्या कावळ्याला मुंगी सांगते, तू घर करू नको. झाड पडणार, कारण मुळं सडली आहेत. तुला दिसत नाही, मी पाहिले कारण माझा संचार मुळापर्यंत आहे. असंच अज्ञान अंधारात, मिथ्याज्ञान फांदीवर व ज्ञानाची नजर मुळापर्यंत जाते.
‘‘रघुकुलरिती सदा चली आई
प्राण जाई पर बचन न जाई’’
हाच धर्म आहे. पण हे सामान्यांना पेलण्यासारखं नाही. कारण त्यांच्याजवळ अंतरिक बळ नसतं. सामर्थ्य नसतं. ज्याजवळ गुण नाही, शक्ती नाही, ज्ञान व निष्ठा नाही तो समर्थ कसा असेल?