Kojagiri Purnima 2020 : कोजागरी पौर्णिमा कधी?, काय आहे व्रत अन् महत्त्व?... जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 08:41 AM2020-10-10T08:41:40+5:302020-10-10T11:27:25+5:30
Kojagiri Purnima 2020 : कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो.
शीतलता आणि सुंदरता यांचा एक आल्हाददायी सुंदर समन्वय म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमेचा चंद्र हा तर पूर्णत्वाचा आविष्कार आहे. यंदा कोजागरी पौर्णिमा ही शुक्रवारी (30 ऑक्टोबर) आली आहे. कोजागरी पौर्णिमेलाच शरद पौर्णिमा, रास पौर्णिमा, कौमुदी व्रत म्हणतात. विविध नावांनी ती ओळखली जाते. हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो.
चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची शक्ती असते जी आरोग्यदायी असते असं म्हटलं जातं. चंद्राच्या किरणांमध्ये अमृत असतं अशा कोजागरी पौर्णिमेशी संबंधित मान्यता प्रचलित आहेत. त्या रात्री चंद्राची किरणं ही विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. त्यामुळे कोजागरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करुन करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ, कार्यक्रम हे आवर्जून आयोजित केले जातात.
कोजागरी पौर्णिमेची वेळ आणि शुभ वेळ
कोजागरी पौर्णिमेचा प्रारंभ - 30 ऑक्टोबर 2020 रोजी 7 वाजून 45 मिनिटं
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय - 30 ऑक्टोबर 2020 रोजी 7 वाजून 12 मिनिटं
कोजागरी पौर्णिमेची समाप्ती - 31 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 8 वाजून 18 मिनिटं
कोजागरी पौर्णिमेचं व्रत
कोजागरी पौर्णिमेचं व्रत हे विशेष मानलं जातं. हे व्रत ठेवल्यास विविध रोगांपासून मुक्तता मिळते असं म्हटलं जातं. गंभीर आजारांनी पीडित असलेल्या व्यक्तींसाठी कोजागरी पौर्णिमेचा उपवास अत्यंत फलदायी मानला जातो. विशेष म्हणजे कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खीर बनवली जाते आणि ही खीर रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. दुसर्या दिवशी ही खीर प्रसाद म्हणून स्वीकारली जाते. कोजागरी पौर्णिमेचं व्रत हे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी देखील ठेवलं जातं, हे व्रत आनंद आणि समृद्धी आणतं. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तांबे किंवा मातीच्या कलशावर कपड्यांनी झाकलेली लक्ष्मीची मूर्ती स्थापित करुन त्याची पूजा केली जाते. तसेच या दिवशी तुपाचे 100 दिवे प्रज्वलित केले जातात. असं केल्याने घरावर लक्ष्मीची कृपा असते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असं म्हटलं जातं.