क्षरला सागर गंगा ओघी मिळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:46 PM2019-06-09T12:46:50+5:302019-06-09T12:46:52+5:30
जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी अभंगाद्वारे विश्वातील चिरंतन सत्य सांगितले आहे.
अहमदनगर : जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी अभंगाद्वारे विश्वातील चिरंतन सत्य सांगितले आहे. उदा. ‘ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यात्वे’ विश्व हे दिसते तसे नाही आपण जगाकडे बघतांना ते जग सत्यत्वाने पाहतो वास्तविक जग सत्य नसून मिथ्या आहे ते तीन नाशाने युक्त आहे. आश्रय नाश, परत: नाश, स्वभावत: नाश. विश्व हे विश्व नसून ते केवळ परमात्माच आहे तोच या जगाच्या रूपाने नटला आहे. ‘यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती’ भूमा म्हणजे व्यापक याचाच अनुबाद जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी एका अभंगात केला आहे, ‘विठ्ठल जळी स्थळी भरला े रिता ठाव नाही उरला’ आज म्या दृष्टीने पहिला’ विठलची विठलचीे’ सर्वत्र विठ्ठलच भरला आहे हि खरी दृष्टी आहे आणि जशी दृष्टी तसी सृष्टी असते. यालाच वेदांतामध्ये दृष्टी सृष्टी वाद म्हणतात.
असेच विश्वातील चिरंतन सत्य सांगतांना महाराजांनी एक वैज्ञानिक दृष्टांत देऊन देव एकच आहे, तोच व्यापक असून एकाचे अनेक होणे हा त्याचा खेळ आहे हा सिद्धांत महाराजांनी एका अभंगाद्वारे सांगितला आहे.
क्षरला सागर गंगा ओघी मिळे । आपणचि खेळे आपणासी ।।१
मधील ते वाव अवघी उपाधी । तुम्हा आम्हामधी तेचि परी ।।२
घट मठ झाले आकाशाचे पोटीे वचनेची तुटी तेथेची ते ३
तुका म्हणे बीजे बीज दाखविले ेफल पुष्प आले गेले वाया ४
सागराच्या मनात एक खेळ खेळावा वाटले आणि त्याने आपले स्थान सोडले व वाफेच्या रूपाने तो आकाशात गेला आणि तिथे ढग बनून विहार करू लागला त्याला पुढे गेल्यावर थंड वारे लागले आणि सागर ढगातून पाऊस होऊन बरसू लागला. तो हिमालयात, सह्याद्रीत व विविध डोंगरावर बरसला आणि त्या पर्वतावरून नदीच्या रूपाने उताराच्या दिशेने खळ खळ आवाज करीत धावू लागला काही ठिकाणी तो धबधबच्या रूपाने भयंकर रूप घेऊन धावू लागला... आम्ही त्याला नावे दिली, गंगा मैया, यमुना मैया, नर्मदा मैया .... गोदावरी माता. अशा नद्यांच्या रूपाने हाच सागर या पृथ्वीवरून सर्वत्र सुजलाम सुफलाम करीत जाऊ लागला. त्याच्या तीरावर तीर्थक्षेत्रे निर्माण झाली आणि लोक पापक्षालनासाठी त्यात स्नान करू लागले. ‘पोखीत तिरींचे पादप । समुद्री जय आप गंगेचे जैसे ।। खारट सागर पण गंगा यमुनेच्या रूपाने ‘गोड’ झाला आणि लोकांना सुसेव्य झाला. आणि विशेष म्हणजे त्यामध्ये इतक्या नद्यांचे पाणी येते तरी तो वाढत नाही आणि इतकी वाफ होते तरी तो कमी होत नाही कारण हा त्याचाच खेळ आहे, म्हणून तो मर्यादा सुद्धा ओलांडीत नाही पण कधी कधी तो त्सुनामीच्या रूपाने उग्र रूप सुद्धा दाखवतो. त्याच्या पोटात चौदा रत्ने देवादिकांना मिळालेत म्हणून त्याला रत्नाकर म्हणतात. जर सागर नसता तर पृथ्वीवरील जीवन राहिले नसते. असा हा सर्व सागराचा खेळ आहे. आणि हाच विषय जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांना सागराच्या किना-यावर सुचला असावा. हि संतांची दृष्टी आहे. आपण किती वेळा समुद्र किनारी जातो पण आपल्याला हे सुचत नाही. त्याला ती दृष्टी असावी लागते. या अभंगाद्वारे महाराजांनी वेदातील एक सिद्धांत सांगितला तो म्हणजे जीव आणि शिव या उपाधी आहेत. तेवढी उपाधी जर गेली तर एकच ब्रहम आहे आणि ते व्यापक असून हे विश्व म्हणजे त्याचाच विस्तार आहे किंबहुना हा त्याचा खेळ आहे. गंगा यमुना हि नावे जर सोडली तर तो फक्त सागरच आहे दुसरे काहीही नाही. मुकुंदराज स्वामी परमामृतमध्ये म्हणतात ‘नदी उगम स्थिरावे । तरी सिंधूपण का न पावे । तैसे जीवाचे ब्रहम का न व्हावे । या स्थिती राहता ।।’ नदीचा खरा उगम सागरात आहे डोंगरात नाही .... समुद्राची वाफ झाली नसती तर नदीचा उगमच झाला नसता.
दुसरा दृष्टांत दिला तो म्हणजे घट मठ हे जर आकाश नसते तर झाले नसते किंबहुना आकाश व्यापकच आहे पण घट आणि मठ याची उपाधी लागली आणि घटकाश, मठाकाश हे नाव आले. खरे तर घट मठ फुटले तर आकाश काही तुटत नाही फक्त बोलण्यापुरताच भेद आहे. तुकाराम महाराज म्हणतात बीजच झाड होत असते तो एका बीजाचाच विस्तार असतो. माउली पण म्हणतात, ‘बीजची जाहले तरू’ अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग, वृक्ष बीज न्यायाने जमिनीत बीज लावले कि मग त्याचे झाड होते, त्याला पाने फुले येतात, पुढे फळे येतात व त्याच्याही पुढे फळात बीज असते आणि तेच बीज परत लावले कि परत झाड, पाने, फुले, फळे, आणि बीज हा सृष्टी क्रम अव्याहत चालू राहते. पण हा मात्र त्या परमात्म्याचा खेळ असतो.
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी(पा) ता.नगर
मोबाईल :- ०४२२२२०६०३.