सागरा सम बनू या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 02:10 AM2020-03-27T02:10:58+5:302020-03-27T02:15:02+5:30
आपण अनेक लोकांच्या बोटांमध्ये त्यांच्या अंगठ्या पाहतो. मनुष्याच्या जीवनावर आकाशातील नक्षत्रांचा परिणाम होतो आणि त्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी सागरातील रत्नांचा वापर केला जातो, ही आश्चर्याचीच गोष्ट नाही का?
- नीता ब्रह्माकुमारी
काही दिवसांपूर्वी मी ओडिशा येथील चिल्का लेकला गेले होते. थोड्या अंतरावर संगमलाही गेले. जेव्हा तिथं बंगालचा उपसागर पाहिला आणि मनात आलं की खरंच मनुष्याला सागरासमान बनायला हवं. तिकडच्या एका मासेमाऱ्यानं आम्हाला मोती, पोवळं, नीलम, पुखराज, पाचू अशी अनेक रत्नं काढून दाखवली. ते दाखवताना त्यांचं महत्त्वही तो सांगत होता. ज्योतिषशास्त्रात या रत्नांचं खूप महत्त्व आहे. आपण अनेक लोकांच्या बोटांमध्ये त्यांच्या अंगठ्या पाहतो. मनुष्याच्या जीवनावर आकाशातील नक्षत्रांचा परिणाम होतो आणि त्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी सागरातील रत्नांचा वापर केला जातो, ही आश्चर्याचीच गोष्ट नाही का? पृथ्वीतलावर राहणाºया प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आज अनेकानेक अडचणी, समस्या येतात. खरं तर बाहेरच्या परिस्थितीचं रूप जे पण आहे ते आपल्या आंतरिक अवस्थेचं प्रमाण आहे. अंतर्विश्वामध्ये जे चाललं आहे तेच बाह्यविश्वात होत आहे. जसं सागराचं बाह्यरूप पाहिलं तर तो कधीच शांत नसतो. पण त्याच्या तळाशी असीम शांती असते. मनुष्याचं जीवनही तसंच आहे. बाहेरचं रूप नेहमीच नवनवीन परिस्थितीच्या घेरात अडकलेलं दिसतं. पण त्या सर्व समस्यांची उत्तरं आपल्या अंतर्विश्वामध्येच आहेत. समुद्राच्या तळाशी अनेकानेक अमूल्य रत्नं मिळतात, त्याचप्रमाणे मनाच्या तळाशी जाऊन त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपणास मिळत जातात. अनेक रहस्यं उलगडली जातात. बंगालच्या उपमहासागराचं विशाल रूप जेव्हा बघत होते, तेव्हा त्याचं ते शुद्ध, स्वच्छ निळं पाणी दूरपर्यंत दिसत होतं. परंतु जेव्हा ते पाणी उफाळून किनाºयाजवळ यायचं तेव्हा त्याचा रंग बदललेला असे. कधी कधी आपलंही असच होतं. खूप वेळा आपण स्वत:ला समजावतो, आज राग करायचा नाही. आज कुणाला दु:ख द्यायचं नाही. पण अशी काही परिस्थिती आपल्यासमोर येते की, आपण चांगलं ठरवलेलं असलं तरी आपल्याकडून परत परत त्याच चुका होतात.