साजरं करूया अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 06:11 AM2019-10-29T06:11:20+5:302019-10-29T06:11:28+5:30

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांसमोर एखाद्या परीक्षेत किंवा युवकांसमोर एखाद्या व्यवसायात अपेक्षित यश मिळालं नाही तर पर्यायी योजना (प्लॅन बी) तयार ठेवली पाहिजे.

Lets celebrate unsuccess | साजरं करूया अपयश

साजरं करूया अपयश

Next

रमेश सप्रे

गोष्ट आहे एका प्रसिद्ध हिंदी अभिनेत्याची. शेकडो चित्रपटात त्यानं विविध भूमिका केल्या. तो स्वत:च सांगत होता स्वत:वर लहानपणापासून घडलेल्या संस्कारांबद्दल. त्याचं कुटुंब राहत असलेल्या गावात एक नवं हॉटेल सुरू झालं. तिथं मिळणारी कॉफी नि सॅँडविच खूप खास असे. पण घरात मिळवते वडील एकटेच आणि कुटुंब त्यामानानं मोठं. तरीही हौशी वडिलांनी एकदा सर्वाना त्या हॉटेलातील कॉफी नि सॅँडविच खायला नेलं. सर्वाना ते खूप आवडलं. सा-या खर्चाचे हिशेब करून असं ठरलं की दोन महिन्यातून एकदा त्याच तारखेला हॉटेलला भेट द्यायची. झालं, हे त्या कुटुंबाचं रुटीनच बनून गेलं. सर्वजण त्या दिवसाची वाट पाहायचे.

एकदा कामावरून घरी आल्यावर वडील त्या अभिनेत्याला म्हणाले, ‘आज फक्त तू नि मी असे दोघेजण फिरायला जाऊया’ तरुण वयातील त्या अभिनेत्याला विशेष हुरूप आला. दोघेजण फिरत असताना वडील म्हणाले, ‘चल आपण त्या हॉटेलात जाऊ या.’ ‘पण बाबा, आपण तर गेल्याच आठवडय़ात गेलो होतो ना?’ या मुलाच्या प्रश्नावर डोळे मिचकावत वडील उद्गारले, ‘जाऊ या रे. थोडी गंमत करू या’ आपल्यावर बाबा एवढे खूष का हे कळलं नाही तरीही तो मोठय़ा उमेदीनं हॉटेलमध्ये शिरला. बाबा म्हणाले, ‘आज तुला पाहिजे तितके कप कॉफी आणि सॅँडवीच तू घे.’ काहीसा विचार करत दोन कप कॉफी आणि सॅँडवीच त्यानं रिचवल्यावर बाबा शांतपणे त्याला म्हणाले, ‘हे बघ, अनुपम, उद्या तुझा एसएससीचा निकाल आहे. ऑफिसमधून येताना मी प्रेसमध्ये जाऊन तुझा निकाल पाहिला. तू नापास झाला आहेस. उद्यापासून काही दिवस तू निराश राहशील. तुला अपराध्यासारखं वाटत राहील. म्हणून आजच तुला हॉटेलमध्ये ही मेजवानी दिली.’ एवढं बोलून ते थांबले नाहीत तर त्याची पाठ थोपटून म्हणाले, ‘जीवनभर एक गोष्ट लक्षात ठेव यश साजरं करणं सोपं आहे. सारेच ते करतात; पण अपयश साजरं केलं पाहिजे. एखाद्या सणासारखं.’

हा अनुभव सांगितल्यावर तो अभिनेता म्हणाला, ‘आयुष्यात माझे अनेक चित्रपट यशस्वी, काही खूप यशस्वी झाले; पण मी कधीही, कुणालाही पार्टी दिली नाही. त्याचप्रमाणे कितीतरी चित्रपट अयशस्वी (फ्लॉप) झाले. त्या प्रत्येकवेळी मी जंगी मेजवानी सर्वाना दिली.’
खरंच आपण आपलं अपयश सहन नव्हे, साजरं करायला शिकलं पाहिजे. व्हाय टॉलरेट, सेलेब्रेट अ फेल्युअर‘ जवळपास हाच संदेश देणारा एक हिंदी चित्रपट अलीकडेच येऊन गेला. पालक, शिक्षक, विद्यार्थी, समाजातील सर्व क्षेत्रतील वडील मंडळी या सर्वासाठी हा संदेश महत्त्वाचा आहे. काळाच्या ओघात तो अधिक प्रभावी होत जाईल. असा कोणता संदेश आहे या चित्रपटात?

सर्वप्रथम आपल्या अपेक्षा, आपल्या कल्पना, आपली स्वप्नं मुलांवर लादणं थांबवलं पाहिजे. यामुळे आपलीच मुलं बनतात ओझी वाहणारी गाढवं किंवा घोडय़ांच्या शर्यतीत धावणारे प्रचंड घोडे, प्रचंड ताण मनावर निर्माण होतो. वजनदार बॅगांमुळे पाठीचा कणा तर या अपेक्षांच्या धाकामुळे मनाचा कणा पार मोडून जातो अनेकांचा. युवा पिढीच्या आयुष्याचे, भावी जीवनाचे सर्व निर्णय स्वत:च घेणारे पालक युवकांचा शत्रू बनतात. अभ्यासक्रम निवडणं, शिक्षण संस्थेत प्रवेश घेणं, परदेशात जाऊन स्थायिक होणं, जीवनाचे जोडीदार निवडणं अशा सर्वच बाबतीत वडील मंडळीची मतं युवा पिढीचं अख्ख जीवन निरस, बेरंगी बनवतात.

परीक्षेतील, व्यवसायातील एकूणच जीवनातील यश म्हणजे सर्वस्व आहे असं न समजण्याचा संस्कार मुलांवर घडवला पाहिजे. खरं तर हल्ली यशापेक्षा प्रभाव प्रसिद्धी, सत्ता मिळवणा-या माणसांच्या यशोगाथा आता तेवढय़ा महत्त्वाच्या मानल्या जात नाहीत जेवढय़ा आपापल्या क्षेत्रत येईल इतका प्रभाव पाडणा-या व्यक्तीच्या ‘कार्यगाथा’ होतात.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांसमोर एखाद्या परीक्षेत किंवा युवकांसमोर एखाद्या व्यवसायात अपेक्षित यश मिळालं नाही तर पर्यायी योजना (प्लॅन बी) तयार ठेवली पाहिजे. हल्ली एकाच ज्ञानशाखेत अनेक अभ्यासक्रम, संधी उपलब्ध असतात. त्याप्रमाणेच एकाच व्यवसाय क्षेत्रात अनेक समांतर व्यवसाय संधी अस्तित्वात असतात. त्यांच्यासाठी मुलांची-युवकांची मनोवृत्ती तयार ठेवली पाहिजे. असं केलं नाही तर युवक निराश, हताश, वैफल्यग्रस्त बनतात. आत्महत्या करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. मनाचे आजार किंवा मनोविकारांनी ग्रस्त झालेली त्यांची मनं जीवन प्रकाशण्यापूर्वीच झाकोळून जातात. उदयापूर्वी अस्त होण्याची परिस्थिती निर्माण होते.

म्हणून यशाबरोबरच अपयशसुद्धा आनंदात स्वीकारलं पाहिजे. पचवलं पाहिजे. मुख्य म्हणजे साजरं करायला शिकलं पाहिजे. एक अतिशय महत्त्वाचा विचार व्यक्त करणारं वाक्य आहे. यश कधी संपणारं नसतं तर अपयश कधीही अंतिम नसतं. (सक्सेस इज नेव्हर एण्डिंग अॅन्ड फेल्यूअर इज नेव्हर फाइनल) बघूया विचार करून. 

Web Title: Lets celebrate unsuccess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.