चला पंढरीसी जाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 05:10 PM2019-07-02T17:10:01+5:302019-07-02T17:10:06+5:30
महाराष्ट्रामध्ये सातशे वषार्पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पंढरीच्या वारीची खांद्यावर घेतलेली भागवत धमार्ची पताका आज सुद्धा तेवढ्याच उत्साहाने वारकरी खांद्यावर घेवून नाचत आहेत.
महाराष्ट्रामध्ये सातशे वषार्पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पंढरीच्या वारीची खांद्यावर घेतलेली भागवत धमार्ची पताका आज सुद्धा तेवढ्याच उत्साहाने वारकरी खांद्यावर घेवून नाचत आहेत. या पायी वारीची अखंड परंपरा संत नामदेव, संत तुकाराम व संत एकनाथ अशा अनेक संतांपासून तर लाखो वारकऱ्यांपर्यत सर्वांनीच अखंडपणे जोपासली आहे. विठ्ठलनामाचा गजर करित होणाºया वारीत सारेच सहभागी होऊन अध्यात्मिक समतेचा संदेश देतात.
या रे या रे लहानथोर । याती भलत्या नारी नर।...अशा या भागवत धर्माच्या अध्यात्मिक परंपरेमध्ये संतानी आपले जीवन समर्पित केले आहे. एवढी मोठी भक्तीची परंपरा लाभलेल्या वैष्णवांच्या वारीच्या निमित्ताने आषाढी एकादशीला सर्व संताची मांदीयाळी पंढरीला अवतरते. आपल्या प्राणसख्या पांडूरंगाला पाहण्यासाठी व त्याला भेटण्यासाठी आपला जीव डोळ्यामध्ये साठवून पायी वारी करून ते पंढरीला येतात. मुखाने नाम गातात आपल्या देवाला मनामध्ये साठवून ते म्हणतात-
टाळी वाजवावी । गुढी उभारावी।
वाट ती चालावी पंढरीची।।
सकळ मंगळ निधी । श्रीविठ्ठलाचे नाम आधी।।
कोसो दूरून आलेले वारकरी आपला अवघा भाग व शीण त्या पांडूरंगाला पाहता क्षणीच विसरून गेलेले आहेत. त्यांना आता आपल्या संसाराची सुद्धा कोणतीही काळजी राहीलेली नाही. कोणत्याही प्रश्नाशिवाय पंढरीच्या रायाला भेटण्यासाठी ते येथे आलेले आहेत. संत तुकाराम महाराज तर म्हणतात-
यारे नाचो अवघे जण । भावे आनंदे करून ।।
गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊ संतजना ।।
सुख फुकासाठी । साधे हरिनाम बोभाटी ।।
प्रेम वाटीतो उदार । देतां नाहीं सान थोर ।।
तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ।।
संतांच्या या मांदीयाळी मध्ये एकमेकांना भेटतांना साक्षात विठ्ठल त्यांना आपल्या अंत:करणाशी लावतो आहे असे त्यांना वाटते. एक प्रकारची अध्यात्मिक लोकशाहीच पंढरीला अवतरते. हरिनाम ते अतिशय प्रेमाने गातात व सर्व संतांना क्षेम देतात. संतांच्या या प्रेमाला चंद्रभागेच्या तीरावर भक्तीची अपार भरती येते. ही महा पर्वणी ते आपल्या डोळ्यात साठवून ठेवतात. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्यांना विठ्ठलच दिसतो अवघे विश्व विठ्ठलमय झाल्याचा भास त्यांना होतो. समत्ववाचा व विश्वरूप दर्शनाचा भाव त्यांचे ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यांना ईश्वर आपल्यापेक्षा वेगळा वाटतच नाही.
जेथे देखे तेथे तुझीच पाऊले। विठ्ठल अवघे कोंदाटले ।।
रूप गुणनाम अवघा मेघश्याम । वेगळे काय ते काय उरले।।
संत तुकारामांनी तर भक्तिसाधनेचा कळस गाठला. ही उच्चतम अवस्था त्यांना जी प्राप्त झाली त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा परमेश्वराविषयीचा उत्कट भाव आहे. भावानेच भक्तीला पूर्णता येते. देव हा भावाचा भुकेला आहे. ज्याचा जसा भाव असेल तसा त्याचा देव असतो म्हणून.
जें जें भेटें भूत । ते ते मानिजे भगवंत ।
असा संदेश ते सर्वांना देतात. वारीच्या माध्यमातून असा विश्वसखाभाव निर्माण होत असतो ती विश्वशांतीसाठी आवश्यक प्रार्थना आहे. वारीमुळे प्रत्येक वारकर्यांना एक समाधानाचा भाव प्राप्त होऊन ते आपल्या प्रेमसंख्या पांडुरंगाला क्षेम देतात.
- डॉ. हरिदास आखरे