साधं जीवन हेच आनंदाचं संजीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 05:18 PM2018-12-25T17:18:39+5:302018-12-25T17:18:47+5:30

अष्टकोनी घर. कुटुंबही अष्टकोनी. वृद्ध आजी-आजोबा. त्यांची दोन मुलं नि सुना. शिवाय नातू आणि नात. एकमेकांवर प्रेम असलं तरी सर्वाची तोंडं आठी दिशांना.

The life of happiness is the life of joy and happiness | साधं जीवन हेच आनंदाचं संजीवन

साधं जीवन हेच आनंदाचं संजीवन

Next

- रमेश सप्रे

अष्टकोनी घर. कुटुंबही अष्टकोनी. वृद्ध आजी-आजोबा. त्यांची दोन मुलं नि सुना. शिवाय नातू आणि नात. एकमेकांवर प्रेम असलं तरी सर्वाची तोंडं आठी दिशांना. सा-यांना जोडणारा एक सेतू म्हणजे घरातला नोकर. सर्वाची कामं करायचा खरा पण वैतागून नि सतत तक्रार करत. त्याच्या चेह-यावर हसण्याचं, आनंदाचं नामोनिशाण कधी फडकलं नाही. त्यातही तो आदल्याच दिवशी नोकरी सोडून गेलेला. 

आज दुसराच दिवस होता. तो नोकर घरात नाही याची कुणालाही आठवणच राहिली नाही. सकाळी निरनिराळ्या वेळी निरनिराळे दरवाजे उघडून निरनिराळ्या स्वरात आर्जव-आज्ञा-तक्रारी होत राहिल्या. 

रामू गरम पाणी आण रे.. रामू जरा औषध आणतोस ना?

अजून चहा कसा आणला नाहीस रामू? मला बेडटी लागतो माहिते ना?

रामू माझी कॉफी.. माझ्या कपडय़ांना इस्त्री, बुटाला पॉलिश.. एक ना दोन.. सर्व दिशांनी मागण्या होऊ लागल्या; पण प्रतिसाद काहीच नव्हता. तेव्हा सारे जण कोरसमध्ये उद्गारले, अरेच्चा (अगंबाई) रामू सोडून गेला नाही का?

नंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. तुमच्या किटकिटीमुळे.. नव्हे, तुझ्या कटकटीमुळे.. याच्या तुसडेपणामुळे.. नाही काही हिच्या ओरडण्यामुळे.. कारणं निराळी असली तरी परिणाम एकच होता- रामू नोकरी सोडून गेला. 

आता काय? प्रॉब्लेमच झाला म्हणायचा.. नाही तरी आपलं सर्वाचंच चुकलंय.. कितीही झालं तरी रामू माणूसच होता ना? असे सुस्कारे सोडले जात असतानाच एक तीक्ष्ण बाणासारखा सा-या वातावरणाला भेदणारा आवाज आला.. त्या वेळी तो सर्वाना वैराण वाळवंटातल्या दिलासा देणा-या पाणथळ जागेसारखा (ओएसिस) वाटला. ‘घरात काही काम मिळेल का?’

सर्वाना ते वाक्य आकाशवाणीसारखं वाटलं. सर्वजण आपापल्या गतीनं त्याच्याकडे धावले सा-यांचा एकच प्रश्न ‘काय काय काम करू शकतोस?’

यावर एखाद्या उडप्याच्या हॉटेलातला पो-या जसा स्तोत्र म्हटल्यासारखा मेनू सांगू लागतो तसं त्यानं अनेक कामांची यादी म्हणून दाखवली. सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला. कारण घरात करावी लागणारी सर्वाची सारी कामं तो करू शकत होता. 

‘तुझी नोकरी पक्की, पण नाव काय तुझं?’ या आजोबांच्या प्रश्नाला त्याचं सहज उत्तर होतं रामचंद्र; पण दादाजी आपण सगळे मला रामू म्हटलं तरी चालेल.’

हे ऐकून सारे जण चित्रतल्या माणसांसारखे स्थिरस्तब्ध झाले. कुणाला तो रामूचा नवा अवतार वाटला तर कुणाला रामूचा सिक्वेल (पुढचा भाग) वाटला. रामू-२!

सर्वाना नमस्कार करून रामूनं बाहेर ठेवलेली मोडकी ट्रंक आणली जिला कुलपाऐवजी लाकडाची ढलपी लावली होती. होतंच काय म्हणा तिच्यात चोरी होण्यासारखं? ती उघडली नि रामूनं दुसरे कपडे काढले तेव्हा आणखी काही कपडे नि काही वस्तू दिसल्या. एक काचेची फ्रेमही दिसली. असेल आईवडील, जवळच्या व्यक्तीचा फोटो किंवा देवाची प्रतिमा. 

पहिल्या काही तासातच या नव्या रामूनं सर्वाची कामं आनंदात करत निरनिराळ्या भाषेत बोलत, गात, विनोद करत, काही मार्मिक गोष्टी सांगत पुरी केली नि या प्रात:कर्मानंतर कामाची दुसरी फेरी सुरू झाली. प्रत्येकाकडे गेल्यावर किमान एक तरी व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीबद्दल काय चांगलं बोलत होती, कसं कौतुक करत होती हे रामू आवर्जून सांगायचा. त्यामुळे घरातले वादंगाचे मृदंग थंड झाले नि सुमधूर संवादाच्या सतारी झंकारू लागल्या. प्रत्येक एकमेकातील गुण हेरून त्याचं विशेष स्तुतीगान करू लागला. घराचं नाव जरी ‘श्रमसाफल्य’ होतं तरी त्यात आनंदाचं नंदनवन फुलू डोलू लागलं. 

रामूच्या लक्षात आलं की आता जर घरातील विसंवाद संपून संबंधाचं संवादगीत गुंजू लागलंय. आता हे टिकवण्याची जबाबदारी मात्र घरातल्या मोठय़ा मुलावर आहे. कारण आजी आजोबा थकलेयत. हा मोठा मुलगा इंग्रजीचा प्राध्यापक आहे. त्याच्याशी रामू सोप्या साध्या इंग्रजीतून बोलायचा. 

आणि त्या दिवशी रामूनं त्या घट्ट विणला गेलेल्या कुटुंबावर बॉम्ब टाकला. ‘मी उद्या इथून जाणार?’ ‘पण का?’ या सर्वाच्या प्रश्नावर रामू ओलावलेल्या डोळ्यांनी म्हणाला, ‘इथलं आता सारं आनंदमय झालंय, दुसरं कुठलं तरी दु:खी कुटुंब मला बोलवतंय. गेलंच पाहिजे मला. मोठे भाईसाहेब सारं छान सांभाळतील यापुढे. असेच आनंदात राहा. यावर पसरलेल्या सघन शांततेचा भेद करत मोठा मुलगा म्हणाला, ‘जाण्यापूर्वी आम्हाला अखंड आनंदात असण्याचं रहस्य सांगून जा’ यावर रामू ट्रंकेतली ती फ्रेम दाखवत म्हणतो ‘हे माझे एमएचं सर्टिफिकेट. काही दिवस शिकवलंही. पण नंतर लक्षात आलं यात पैसा प्रतिष्ठा आहे; पण आनंद नाहीए. सारं सोडलं नि अगदी साधं जीवन जगत स्वत: आनंदी राहत इतरांना आनंद देत फिरत असतो. प्राध्यापक महाशय. इट्स सो सिंपल टू बी हॅपी, बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी सिंपल. हेच ते आनंदाच रहस्य. साधं सरळ सोपं जगूया नि आनंदात राहू या.. चला निघतो आता ‘राम राम’!

Web Title: The life of happiness is the life of joy and happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.