आयुष्यात शाश्वत सापडत नाही, तोवर जीवन आनंदी नव्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:41 AM2019-05-29T05:41:29+5:302019-05-29T05:41:41+5:30
तुम्ही स्वत:ला जे काही समजता त्यापेक्षा जरा जास्त विलक्षण अशा कशाचा तरी जर तुम्हाला स्पर्श झाला असेल, तर कृपया तुमच्या जीवनाचा काही भाग त्या दिशेने समर्पित करा.
- सद्गुरू जग्गी वासुदेव
तुम्ही स्वत:ला जे काही समजता त्यापेक्षा जरा जास्त विलक्षण अशा कशाचा तरी जर तुम्हाला स्पर्श झाला असेल, तर कृपया तुमच्या जीवनाचा काही भाग त्या दिशेने समर्पित करा. आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही गुंतवणूक केलेली आहे. तुमच्या उदरनिर्वाहासाठी, तुमच्या सुख-सुविधांसाठी, तुमच्या भावनांप्रति. तर मग हे अगदी महत्त्वाचे आहे की तुमचे जीवन, तुमची ऊर्जा आणि तुमचा वेळ तुमच्या सीमित मर्यादांपलीकडे जाण्याच्या दिशेने गुंतवला पाहिजे. जेंव्हा मी ‘‘तुम्ही कोण आहात’’ असे विचारतो तेव्हा तुम्ही जर प्रामाणिकपणे आपल्या आत डोकावून पाहिलेत, तर सध्या तुम्ही म्हणजे केवळ एक मन आहात - मतांचा ढिगारा ङ्क्त आणि एक शरीर. कितीतरी लोकांची मते, अभिप्राय साठवले गेले आहेत तुमच्या मनात तुमचं शिक्षण, तुमचा समाज, तुमचा धर्म, तुमची संस्कृती.. मतांचे हे मोठे ढीग आणि सोबत हे शरीर. यावाचून आणखी काहीही नाही. आणि या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे बाहेरून आल्या आहेत. या गोष्टी म्हणजे ‘‘मी’’ असं म्हणण्यासारखं त्यात काहीही नाही. जोपर्यंत तुमच्या आत, शाश्वत, असं काही जोपर्यंत तुम्हाला सापडत नाही, तोवर तुम्ही हे जीवन आनंदी, समाधानी आणि परिपूर्णतेने जगू शकणार नाही. बाहेरून मिळवलेलं कधीही तुमच्याकडून हिरावून घेतलं जाऊ शकतं, म्हणून नेहमी तुम्ही ती गोष्ट तुमच्याकडून हिरावून घेतली जाण्याच्या भीतीत जगत राहणार. तुम्ही कदाचित असा विचार कराल, ‘‘नाही, हा सर्व मूर्खपणा आहे. मी यशस्वी आहे, मी मजेत आहे.’’ आपण यशस्वी आणि मजेत आहात ही उत्तम गोष्ट आहे, पण अशा सुख-सुविधांवर विश्वास ठेवू नका, कारण या प्रकारच्या खुशी आणि स्वास्थ्याची उद्या सकाळी उलथापालथ होऊ शकते.