निष्काम कर्मयोगाने जीवन प्रकाशमान होईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 10:34 PM2019-11-02T22:34:26+5:302019-11-02T22:35:46+5:30
रविंद्र टागोरांनी देखील गीतांजलीत कर्मयोगाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे. ..
- डॉ. दत्ता कोहिनकर-
संत तुकाराम महाराजांचे प्रवचन ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांना वाटले, भक्ती हेच जीवनाचे परमउद्दीष्ट असेल तर मग कशाला लढाया करायच्या, चित्तशुद्धीसाठी महाराज तासनतास भवानी मातेच्या मंदिरात जाऊन ध्यान करत बसू लागले. माता जिजाऊने आठवडाभर हे दृश्य न्याहाळले व एक दिवस त्या महाराजांच्या शेजारी महाराज ध्यान करत असताना येऊन बसल्या व रडू लागल्या. शिवाजी महारजांनी डोळे उघडून मॉसाहेबांना अश्रु ढाळण्याचे कारण विचारले तेंव्हा मॉसाहेब म्हणाल्या, शिवबा , मोगल मंदिरातील मूर्ती व कळस तोडत आहेत, साधुसंधतावर हल्ले करत आहेत, स्त्रींयावर अत्याचार करत आहेत, प्रजेला जगणे असह्य झाले आहे. शिवबा या परिस्थितीत तुला ध्यानाऐवजी हातात तलवार घेऊन प्रजेला न्याय देणे गरजेचे आहे. शिवबा प्रजेला न्याय देण्यासाठी मंदिरातून बाहेर ये. अशा पद्धतीने पूर्णतः ध्यानात मग्न होणाऱ्या शिवाजीमहाराजांना जिजामातेने कर्मयोगी होण्याचा सल्ला दिला व महाराजांनी अन्यायग्रस्त प्रजेचे रक्षण करून त्यांना न्याय दिला.
परवाच एक 20 वर्षाचा मुलगा भेटायला आला होता. "मला भक्त व्हायचय" असा तगादा त्याने लावला होता. त्याचे शरीर दुर्बल झाले होते. चेहऱ्यावर निरूत्साह दिसत होता. तासनतास तो मंदिरात बसत होता. कोणीतरी या लहान वयातच त्याच्यामनात भक्तीचे विचार पेरले होते. हा मुलगा त्या विचारांनी पूर्णतः वृद्धांसारखा विचार करत होता. ज्यावेळी त्याचे लग्न होईल त्यावेळी एका वृद्धाचा विवाह होणार होता. भक्तीच्या अती विचारांनी तो शारिरीक मानसिक व आर्थिकरित्या दुर्बल झाला होता. तो तरूणपणीच खूप गंभीर झाला होता. तारूण्यातील आनंद लुटण्याची क्षमता तो हरवून बसला होता.
विवेकानंद म्हणत, तासनतास मंदिरात घंटा वाजवत बसणाऱ्या मुलांपेक्षा मैदानावर जाऊन आपली शरीरयष्टी कमावणारा ईश्वरच्या निकट लवकर पोहचू शकतो. कर्मयोगाला स्वामीजींनी जास्त महत्त्व दिले होते.
मराठी संत हे देवाचे भक्त होते, भक्तीच्या दिशेने वाटचाल करताना त्यांनी भक्तीयोगाबरोबर कर्माला प्रधान्य दिले होते.कांदा-मुळा-भाजी-अवघी विठाई माझी म्हणणारे सावतामाळी, मडकी घडवणारे गोरा कुंभार, आम्ही नाभिक-नाभिक, करू हजामत बारीक म्हणणारे सेना महाराज यांनी कर्मयोगाला प्राधान्य दिले होते.
रविंद्र टागोरांनी देखील गीतांजलीत कर्मयोगाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे. देवाचा शोध कोठे घेतोस? तो मंदिराच्या गाभाऱ्यात शोधण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला खडी फोडणाऱ्या पाथरवट किंवा शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेजारी तो तुला लवकर भेटेल. अलीकडे तर बरीचशी लोक ठराविक देवाच्या दर्शनाला ठराविक वारीच जाऊ लागलीत. विशिष्ट दिवशीच मंदिरात अतोनात गर्दी होते. तीर्थस्थळावर भक्तांच्या रांगा लागतात. मंदिराबाहेर काही सेवेकरी भेटतात, साहेब त्वरित मुखदर्शन करून देतो प्रत्येकी 500 रू. पडतील अशी सौदेबाजी करतात. श्रीमंत माणूस पैशाच्या सहाय्याने त्वरित विशेष दरवाजाने मुखदर्शन करून बाहेर येतो. या दर्शनाने नेमके काय साधले याचा साधा विचारही त्याला शिवत नाही. मंदिरातून बाहेर पडताना व्यक्तीच्या मुद्रेवर प्रसन्नता असली पाहिजे. तेथील सकारात्मक तरगांचा त्याला लाभ घेता आला पाहिजे. धक्के खात, चिडचिड करत, घाम पुसत, झाल दर्शन- सुटलो एकदाचे , असे म्हणत मंदिरातून बाहेर पडणे ही भक्तीची दैनाच म्हणाली लागेल. म्हणून मित्रांनो अंधभक्तीला दूर सारून ज्ञानयोगाला निष्काम कर्मयोगाची जोड दिल्यास अध्यात्माच्या प्रकाशाने जीवन प्रकाशमान होईल व सतचित्त आनंदाची अनुभूती घ्याल.