परमभक्ताची इच्छा पूर्ण करतो परमेश्वर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 04:06 AM2019-11-23T04:06:47+5:302019-11-23T04:08:54+5:30
भगवंत प्रसन्न झाला की, आपल्या परमभक्ताच्या सर्वच इच्छा पूर्ण करतो.
भगवंतांच्या अतिभव्य विराट रूपात अर्जुनाला भगवंतांनी आपले मूळचे श्री विष्णूरूप दाखविले होते. परंतु सर्वपक्षी काळाचे, मनाचा थरकाप उडविणारे भगवंतांचे भव्य स्वरूप अर्जुनाला सहन झाले नव्हते. भगवंतांनी आपल्या परमभक्ताची ही इच्छासुद्धा पुन्हा पूर्ण करून आपले कृष्णरूप प्रकट केले होते. भगवंत प्रसन्न झाला की, आपल्या परमभक्ताच्या सर्वच इच्छा पूर्ण करतो. त्याचे दर्शन अकराव्या अध्यायात दिसते़ भक्तश्रेष्ठ अर्जुनाने भगवंतांचे गोडगोडुले सुंदर असे रूप प्रत्यक्ष अनुभवले होते आणि विश्वरूपदर्शन, प्रसंगी अतिभव्य विराट स्वरूपसुद्धा अनुभवले होते़ अर्जुन हा सर्वात श्रेष्ठ असा भाग्यवान परमभक्त होता़ भगवंतांनी तर ज्ञानयोग्याची श्रेष्ठता अर्जुनापुढे निर्गुण निराकार परमेश्वराच्या उपासनेचे महत्त्व विषद करून सांगितले होते़ अर्जुनापुढे त्यामुळे एक नवेच प्रश्नचिन्ह उभे राहिले की, सगुण साकार परमेश्वराची उपासना करणे इष्ट की, ज्ञानयोगाला अभिप्रेत असलेल्या निर्गुण निराकार परमेश्वराची उपासना करावी आणि या दोन्ही उपासनांमधील श्रेष्ठ उपासना कोणती? तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणाले,
मय्यावेश्यपनो ये मां नित्ययुक्ता उपासने।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युकदतमा मना: ।।
माझ्यात तल्लीन होऊन मन:पूर्वक माझ्याच भजन पूजनात अष्टौप्रहर दंग असतो़, तोच खरा सर्वश्रेष्ठ योगी पुरुष असतो़ तो परमभक्त असतो़ तो परमभक्त मला अत्यंत प्रिय असतो़ थोडक्यात सांगायचे झाले, तर माझ्या सत्य स्वरूपात सर्वांगाने तल्लीन होऊन, माझ्यात मग्न होऊन, परमश्रद्धेने माझ्या सगुण साकार रूपाची जो उपासना करतो, तोच श्रेष्ठ योगी पुरुष असतो़ भगवंत अस्तित्वाची एकदा का मन बुद्धीने एकाग्र झाले की, समाधीपर्यंत हा माझा परमभक्त सहजपणे पोहोचतो, एवढे तू ध्यानात घे.