कोदंडधारी राम सदैव स्मरणात राहू द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 04:50 AM2019-09-26T04:50:51+5:302019-09-26T04:52:25+5:30
जेव्हा धर्म साकडला होता, संकटात होता, तेव्हा श्रीराम आपल्या धनुष्यासी एकरूप झाले.
- शैलजा शेवडे
परित्राणाय साधुनां, विनाशाय च दुष्कृतां.
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे..
श्रीराम विष्णूचा अवतार आहे. भगवद्गीतेत, आपल्या विभूती सांगतांना श्रीकृष्ण म्हणतात, राम: शस्त्रभृतामहं. शस्त्रधाऱ्यांमध्ये मी राम आहे. त्याबद्दल ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वरीत म्हणतात,
शस्त्रधरां समस्तां माजीं । श्रीराम तो मी ॥ जेणें साकडलिया (संकटात सापडलेल्या) धर्माचे कैवारें (पक्ष)। आपणपयां (स्वत:ला) धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मीये एक मोहरें (एकमार्गीं) । केलें त्रेतीं (त्रेतायुगांत) ॥ पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं (योग्य वेळी) । प्रतापलंकेश्वराची सिसाळीं (मस्तकपंक्ती) । गगनीं उदो म्हणतया हस्तबळी । दिधली भूतां (आकाशांत उदो उदो म्हणणाºया भूतांच्या हातांवर बळी म्हणून टाकली) ॥ जेणे देवांचा मानु गिंविसला । धर्मासि जीर्णोद्धार केला । सूर्यवंशीं उदेला (उगवलेला) । सूर्य जो कां ॥ तो हतियेरूप रजतिया आंतु। रामचंद्र मी जानकीकांतु ।
अहाहा किती सुंदर वर्णन! धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा धर्म साकडला होता, संकटात होता, तेव्हा श्रीराम आपल्या धनुष्यासी एकरूप झाले. स्वत:च जणू धनुष्य बनले. नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण त्यांची मस्तके आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाच्चे, त्यांच्या हातात बळी म्हणून दिली. रामचंद्राने देवांचा मान, देवांची कीर्ती परत मिळवून दिली आणि धर्माचा पुनरुद्धार केला. सूर्यवंशात तो प्रतिसूर्यच उदयास आला, तो जानकीनाथ राम माझी विभूती आहे.
तो कोदंडधारी राम सदैव स्मरणात राहू द्या.
दिनानाथ हा राम कोदंडधारी,
पुढे देखता काळ पोटी थरारी ।
जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी,
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।