सर्वोच्च ईश्वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 03:46 AM2019-04-26T03:46:42+5:302019-04-26T03:51:42+5:30
श्रीकृष्ण हा सर्वोच्च ईश्वर असून त्याची पुष्टी हाच मानवाच्या अंतिम कल्याणाचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे
- शैलजा शेवडे
अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम
मधुराधिपतीचे ओठ मधुर आहेत, वदन (मुख) मधुर आहे, नयन मधुर आहेत, हास्य मधुर आहे, हृदय मधुर आहे, गती मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे.
वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम
त्याचे बोलणे मधुर आहे. त्याचे चरित्र मधुर आहे. वस्त्र मधुर आहे, अंगविक्षेप मधुर आहेत, चालणे मधुर आहे, फिरणे मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे.
मधुराष्टकातल्या या ओळी ऐकल्या की आपले मन भक्तीरसानं भरून जातं. मधुराष्टक वल्लभाचार्यांनी रचलं. वल्लभाचार्य हे पुष्टिमार्गाचे प्रवर्तक होते.
पुष्टी म्हणजे ईश्वराचा अनुग्रह वा कृपा असे भागवतात म्हटलेले आहे. श्रीकृष्ण हा सर्वोच्च ईश्वर असून त्याची पुष्टी हाच मानवाच्या अंतिम कल्याणाचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, असे या संप्रदायात मानलेले असल्यामुळे याला वल्लभ संप्रदाय, शुद्धाद्वैती संप्रदाय, रुद्र संप्रदाय इ. नावेही आहेत. शुद्धाद्वैत तत्त्वज्ञान हा या संप्रदायाचा सिद्धांतपक्ष असून पुष्टिमार्ग हा साधनापक्ष आहे. ईश्वरी कृपेनेच आत्मदर्शन होऊ शकते, हे विचार मुंडक व कठ या उपनिषदांत येऊन गेले आहेत. श्रीकृष्ण हेच सर्वोच्च ब्रह्म असून त्याचे शरीर सच्चिदानंदमय असते. पुरुषोत्तम असा तो कर्ता आणि भोक्ताही असून स्वत:च्या इच्छेने जग निर्माण करतो. विष्णूच्या वैकुंठापेक्षा उच्चस्थानी असलेल्या व्यापिवैकुंठात राहून तो आपल्या भक्तांसह लीला करतो. या व्यापिवैकुंठात गोलोक असून त्यात वृंदावन, यमुनेचे अस्तित्व आहे. या गोलोकात जाऊन तेथील कृष्णलीलांत सामील होणे, हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय होय.