आभासी जगात स्वत्व हरवणे घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:48 PM2019-03-06T13:48:51+5:302019-03-06T13:49:59+5:30

मोबाईलने आज व्यक्तीचे जीवन सुखकारक तर केलेच आहे परंतू त्याच बरोबर व्यक्तीच्या जीवनात असंख्य प्रश्न ही निर्माण केले आहेत.

lost yourself in the virtual world is deadly | आभासी जगात स्वत्व हरवणे घातक

आभासी जगात स्वत्व हरवणे घातक

Next

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. तंत्रज्ञानात आज खूप मोठी प्रगती झाली आहे. तंत्रज्ञानामुळे व्यक्तीचे जीवन अत्यंत सुखकारक झाले आहे. आज प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.  मोबाईल हा तंत्रज्ञानाचाच अविष्कार आहे. मोबाईलमुळे जग जणूकाही व्यक्तीच्या हातात सामावले आहे. स्मार्ट समजला जाणाऱ्या मोबाईलने आज व्यक्तीचे जीवन सुखकारक तर केलेच आहे परंतू त्याच बरोबर व्यक्तीच्या जीवनात असंख्य प्रश्न ही निर्माण केले आहेत. सर्च इंजिनवर व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर सापडत आहे परंतू सुप्त मनाला हवी असणारी शांतता, समाधान, आनंद या सारख्या भावनांचे उत्तर मोबाईलचे अर्थात इंटरनेटचे सर्च इंजिन शोधू शकत नाही.  चारचौघात मैदानी खेळातून मिळणारा आनंद  व्यक्ती मोबाईलवर खेळाचे वेगवेगळे अॅप घेऊन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे परंतू खरंच त्याला यातून आत्मिक आनंद, सुख, समाधान मिळते आहे का ? 

आज तरुण पिढीच्या मनावर राज्य करणारा मोबईलवरचा खेळ म्हणजे ‘ पबजी ’. या खेळाने तरुण पिढीच काय  परंतु काही सुज्ञ देखील स्वतःच्या मनाची शांतता हरवून बसले आहे. आज तरुण पिढी तासंतास या खेळत एकदम तल्लीन झाली आहे. पबजी खेळ खेळणाऱ्या व्यक्तींना हा खेळ म्हणजे आपले सर्वस्व वाटू लागला आहे. तहान भूक विसरून अनेक जण या खेळत नखशिखांत बुडाले आहे. त्यांना आपण काय करतोय ? कुठे आहोत ? काय बोलतोय ? आपण या वेळी काय करायला हवे ? यातून आपण काय मिळवतो आहे ? यातून खरंच आत्मिक आनंद , सुख , समाधान मिळते आहे का ? हेच कळेणासे झाले आहे. 

पबजी खेळामुळे तरुण पिढी एका मानसिक आजाराची बळी पडत आहे. या खेळामुळे स्वतःचे म्हणजेच  ‘ स्व ’ चे अस्तित्व आजची पिढी गमावून बसत आहे. या खेळातून मिळणारा क्षणिक आनंद त्यांना आत्मिक आनंद वाटत आहे. खरे तर त्यांच्या हेच लक्षात येत नाही की, आत्मिक आनंद म्हणजे कुठली ही अपेक्षा न करता चिरंतन सुप्त मनाला मिळणारे समाधान. अशा प्रकारचे समाधान खरंच या पबजी खेळातून मिळत असेल का ? निश्चित नाही. मग तरी ही आजची तरुण पिढी का या खेळात इतकी अडकून पडली आहे ? याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईलमुळे जरी जग जवळ आले असेल तरी व्यक्ती एकमेकांपासून दूर गेला आहे. आनंद, प्रेम, दया, राग, लोभ, मद, मोह. मत्सर यांसारख्या भावना सोशल साईट वरच्या स्टीकर वापरून व्यक्त करता करता व्यक्तीच्या अंगी असणारी संवादाची भाषा तो विसरून चालला आहे. पबजीमुळे आत्मचिंतन करून बघायची फुरसत ही या तरुण पिढीला नाही. एकमेकांसमोर बसून त्याला आपल्या  भावना सुद्धा व्यक्त करता येत नाही. तो आधार घेतोय त्या सोशल साईट वरच्या स्टीकरचा आणि याचमुळे तो गुंतत जातोय पबजी सारख्या खेळांमध्ये, आणि हरवून बसतो आहे ‘ स्व’ ला. आज पबजी सारख्या खेळामुळे तरुण पिढी स्वतः मध्ये असणारे सामर्थ्य, शक्ती, उत्साह हरवून बसत आहे. अनेक जण या खेळामुळे मानसिक रुग्ण होत आहे. 

अशा परिस्थितीत आजच्या सुजाण पालकांनी पबजी खेळणाऱ्या तरुणांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची कला शिकवणे गरजेचे आहे. जो पर्यंत आजची पिढी स्वतःच्या भावना मुक्तपणे व्यक्त करणार नाही तो पर्यंत ही पिढी अशाच प्रकारे मोबाईलवरच्या विविध खेळांच्या माध्यमातून आत्मिक सुख शोधण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी त्यांना हे समजून सांगणे गरजेचे आहे की, यामधून मिळणारा आनंद हा आत्मिक आनंद नाही. तसेच हे आत्मिक सुख ही नाही. हा फक्त आणि फक्त क्षणिक आनंद आहे. ज्यातून आजची पिढी स्वतःतील सामर्थ्य हरवून बसत आहे. हे त्याला पटवून देणे गरजेचे आहे. खरे आत्मिक सुख हे स्वतःच्या कर्तृत्वाने मिळणाऱ्या यशामध्ये आहे. त्यासाठी तासंतास पबजी खेळामध्ये वेळ न घालवता हा वेळ स्वतःच्या विकासासाठी खर्च केल्यास, त्यातून मिळणारे यश-अपयश हे व्यक्तीला आत्मिक बोध, सुख तसेच आनंद देत असतात. हे आजच्या पिढीला समजून सांगणे गरजेचे आहे. तसेच आजच्या पिढीला यांसारख्या मानसिक रुग्ण बनवणाऱ्या खेळांपासून आजच्या पिढीला वाचवणं हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. तसेच त्यांना खरे आत्मिक सुख, आनंद याचा योग्य मार्ग दाखवणे गरजेचे आहे.

- सचिन व्ही. काळे ( 9881849666 )

Web Title: lost yourself in the virtual world is deadly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.