प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 07:32 PM2019-06-17T19:32:57+5:302019-06-17T19:33:11+5:30

भक्ती कर्मात देखील परमप्रेम असल्याशिवाय भक्तीला अर्थ नाही.

Love is built in love. They not going away | प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥

प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥

Next

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

भक्ती साधनेत नुसत्या बाह्य उपचाराला किंमत नाही. गणित शास्त्रात जसे नुसत्या शून्याला किंमत नाही, त्या शून्यामागे एखादा अंक असेल तरच शून्याला किंमत प्राप्त होते तसेच भक्ती कर्मात देखील परमप्रेम असल्याशिवाय भक्तीला अर्थ नाही. देवर्षी नारद महाराज म्हणतात -
सातु अस्मिन् परम प्रेमरु पा ॥
भगवंत हा परमप्रेम स्वरुप आहे. तो नुसत्या प्रेमाचा विषय नाही तर परमप्रेमाचा विषय आहे. नुसते प्रेम हे शारीरिक पातळीवरचे असते. परम प्रेमात वासनेचा भाव नसतो फक्त समर्पणाचाच भाव असतो. एक उर्दू शायर म्हणतो -
मोहब्बत सीखनी है, तो सीख शमा से ।
मौत तक जलती है पर उफ् निहं करती जुबाँ से ॥

परमप्रेमच बघावयाचे असेल तर दिव्यातील ज्योतीकडे बघा.. स्वत:चा अंत होईपर्यंत ती पतंगासाठी जळत राहते पण तिच्या तोंडातून उफ् असा उद्गार निघत नाही.

अध्यात्मशास्त्रात या परमप्रेमाच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत, 
१) पूर्व राग
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या अवस्थेचे वर्णन एका विरहिणी मध्ये करतात -
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकून गे माये सांगता हे ॥

परमेश्वराच्या प्राप्तीसाठी चित्तात निर्माण तळमळ, अंतरंगात निर्माण झालेली जी अनामिक ओढ, त्यासच पूर्वराग असे म्हणतात. एकनाथ महाराज रु क्मिणी स्वयंवर ग्रंथात पूर्वराग अवस्थेचे वर्णन करतात -
कृष्ण स्वरूपाची प्राप्ती । भीमकी सादर श्रवणार्थी ॥
ह्रदयी अविर्भवली मूर्ती । बाह्य स्फूर्ती मावळली ॥

नारदांच्या मुखातून भगवंताच्या लीला ऐकल्या आण िरु क्मिणीचे अष्टसात्विक भाव जागे झाले. तिची ही जी अवस्था झाली त्यालाच पूर्वराग असे म्हणतात.

२) मीलन
या अवस्थेत साधकाला निर्गुण परमात्म्याचा सगुण साक्षात्कार झालेला असतो. ही अवस्था अवर्णनीय आहे. संत ज्ञानेश्वर महाराज या अवस्थेचे वर्णन करतांना म्हणतात -
निरखित निरखित गेलिये वो । पाहे तव तन्मय झालिये वो ॥
माझ्या सूक्ष्मदृष्टीने मी परमात्म्याचा शोध घेतला आणि मग तो मला दिसला, मन शांत झाले, ही मीलन अवस्था आहे. भक्तीशास्त्रात ही अवस्था अत्यंत श्रेष्ठ आहे.

३) विरह
भगवंताची भेट झाली व कांही कारणाने त्याचा वियोग झाला तर चित्ताचे ठिकाणी जी आगतिकता निर्माण होते तिला विरह अवस्था असे म्हणतात. नाथबाबा एका गौळणीत या अवस्थेचे वर्णन करतात, भगवंताला नेण्यासाठी अक्रूर गोकुळात आले. देव उद्या मथुरेला जाणार, या विरह अवस्थेने व्रजवासियांची जी अवस्था झाली ती अवर्णनीय आहे.
नाथबाबा वर्णन करतात -
रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी ।
भूमी पडल्या व्रजबाळी कोण त्या सांभाळी ।
नयनांच्या उदकाने भिजली धरणी ॥

श्रीकृष्णाच्या विरहाने अगतिक झालेल्या गोपिका गोविंदा माधवा म्हणत रथासमोर आडव्या पडल्या व अक्रूराला म्हणाल्या, काका..! हा रथ आमच्या अंगावरून न्या... त्यांचा तो आक्र ोश बघून दगडालाही पाझर फुटला असेल. या अवस्थेला विरह अवस्था म्हणतात. एवढी अनन्य प्रेम लक्ष्मणभक्ती फक्त गोपिकांच्या जवळ होती म्हणून त्यांना देव बांधता आला. तुकाराम महाराज म्हणतात - प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥
 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक )

Web Title: Love is built in love. They not going away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.