प्रेमाचा राम राम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:22 AM2018-11-28T06:22:41+5:302018-11-28T06:22:51+5:30
‘प्रभू श्रीराम’ प्रत्येक भारतीयाच्या तनामनात व्यापून राहिलाय.
- शैलजा शेवडे
राम म्हणा विश्वासाने, अनुदिनी, श्वास घेता,
काय विश्वास श्वासाचा, पुन्हा येईल तो घेता..।
‘प्रभू श्रीराम’ प्रत्येक भारतीयाच्या तनामनात व्यापून राहिलाय. ‘राम’ शब्द असलेले किती वाक्प्रचार, शब्दसमूह आपण सहजपणे वापरतो. आपण एकमेकांना भेटलो की ‘राम राम’ म्हणतो. सकाळच्या पहिल्या, प्रसन्न प्रहराला आपण ‘रामप्रहर’ म्हणतो.
भरपूर कामं असतील, तर ‘रामरगाडा’ म्हणतो.
एखाद्या गोष्टीत काही अर्थ राहिला नसेल, तर ‘त्यात काही राम नाही’ असं म्हणतो.
व्यक्ती मृत पावली तर त्या व्यक्तीने ‘राम म्हणलं’
असं म्हणतो.
खारीच्या पाठीवरच्या पट्ट्यांना आपण ‘रामाची बोटं’ म्हणतो.
मुंगूस दिसला आणि आपण त्याला ‘रामाची शपथ’ घातली, तर तो आपल्याला तोंड दाखवतो, अशी आपली श्रद्धा असते.
एखाद्या गोष्टीला बाकी कुणी साक्षीदार नसला तरी ‘राम’ सर्वसाक्षी आहे, त्याला माहीत आहे, या भावनेने ‘राम जाणे’ असं सहजपणे म्हणतो.
‘हे राम’ हा आपला सहजोद्गार असतो.
हिंदीत ‘रामभरोसे’ हा शब्द वापरतात.
कधी आपण ‘रामा, शिवा, गोविंदा..’ असं म्हणतो.
का बरे श्रीराम आपले
दैवत आहे...
राम नाम हे अंतर्यामी, जपणे अवगत आहे,
जीवन म्हणजे भक्तीयोग हा, माथा अवनत आहे ।
तरीही ‘राम’ या शब्दावरून एवढे वाद का होतात...
‘राम’ जाणून घ्या हो...!
नको शंका मनी, नको फुका वाद,
श्रीरामाला साद, मनोभावे ।
अयोध्यापती तो, आहे क्षमाशील,
तारून जाशील, भवसिंधु ।
शबरीची उष्टी, चाखली ती बोरे,
ठेवील का तो रे, हीनभाव ?
जानकीचा राम, जाणुनीया घ्यावा,
मुखी येऊ द्यावा, निरंतर ।
असे सर्वांवरी, कृपादृष्टी ज्याची,
खात्री ठेव त्याची, रक्षिल तो ।
पतित पावन, राम आहे माझा
राम आहे तुझा, प्रत्येकाचा ।
चार दिन जिणे, कशाला विवाद,
प्रेमाचा संवाद, राम राम ।