आनंद तरंग - ‘प्रीतीसी विखो होईजे’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 07:35 AM2019-07-30T07:35:04+5:302019-07-30T07:35:37+5:30
प्रीती हा प्रेमाचा अर्धा प्रवास आहे़ प्रेमाच्या गावाला प्रीतीच्या गावावरूनच जावं लागतं़
बा.भो. शास्त्री
प्रीती हा प्रेमाचा अर्धा प्रवास आहे़ प्रेमाच्या गावाला प्रीतीच्या गावावरूनच जावं लागतं़ प्रीती हा कच्चा माठ व प्रेम हा पक्का माठ आहे़ प्रेम हे प्रीतीचं तारुण्य तर भक्ती हे त्याचं लावण्य आहे़ प्रीती फक्त प्रेम तर भक्ती हे परमप्रेम आहे़ भक्तीची व्याख्या करताना ते म्हणतात, ‘सात्वस्मिनरमप्रेमरूपा’ येथे भक्तीला परम हे विशेषण लावलं आहे़ म्हणून स्वामींनी संतांच्या प्रेमाला परमप्रीती असा शब्द वापरला आहे़ प्रेमभंग हा शब्द आपण नेहमीच ऐकतो़ पण भक्तीभंग ऐकायला मिळत नाही़ कारण भक्ती कधीच भंगत नाही़ तेच परमप्रेम असतं़
संत तुकोबा निखळ संतप्रेमाचं वर्णन करतात, ‘संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दु:खलेश’ सागर पार करायचा असेल तर अलीकडचा तीर गाठावाच लागेल तर गाठावाच लागेल़ भले पलीकडचे तीर दिसणार नाहीत. पण ते अलीकडच्या तिराला जोडलेले असतात़ सागर प्रवासाचा आरंभ तेथूनच करावा लागतो़ असाच प्रीती हा आरंभ आहे. तिने संसार चांगला होतो व परमप्रीतीने परमार्थ चांगला होतो़ जेव्हा आपण प्रीतीला प्रतिसाद देत नाही़ तेव्हा अप्रीती जन्म घेते़ संबंध खराब होतात़ खोट्या प्रेमाच्या मागे लागून खऱ्या प्रेमाला झुगारून देतो़ खोटं तर धोका देतंच, पण खरंही दूर निघून जातं़ जसे आपल्या आवडीचे विषय असतात, तसंच आपणही इतरांच्या आवडीचा विषय झालो पाहिजे़ समाजाची मतं नेत्याला आवडतच असतात़ पण नेता समाजाला आवडतो का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे़ विखो शब्दाचा अर्थ विषय असा आहे़ कुणी चहाचा आग्रह करतो़़ तुम्ही नकार दिला तर तो नाराज होतो़ कारण वस्तूसोबत आपण व्यक्तीचाही स्वीकार करीत असतो़ वस्तू नको म्हणतो तेव्हा व्यक्तीलाही नाकारत असतो़