संयम ठेवून वेळेचा सदुपयोग करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:50 AM2020-04-08T05:50:37+5:302020-04-08T05:50:42+5:30

घरातील एकांतवासात वेळेचा सदुपयोग करून घेण्याची एक संधी आपल्याला मिळाली आहे.

Make the good use of your time by exercising patience | संयम ठेवून वेळेचा सदुपयोग करावा

संयम ठेवून वेळेचा सदुपयोग करावा

Next

घरातील एकांतवासात वेळेचा सदुपयोग करून घेण्याची एक संधी आपल्याला मिळाली आहे. सध्या टीव्ही, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा माध्यमांवर आपण वेळ घालवत आहोत. त्यामधील थोडा वेळ काढून आणि घरात परस्परांतील अंतर राखून पंचाक्षरी मंत्राचे, महामृत्युंजय मंत्राचे किंवा आपल्या इष्टदेवाच्या मंत्राचे सामूहिक रूपाने पठण करणे अधिक योग्य राहील. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
सध्या कोरोनारूपी महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण जग गृहबंधनात आहे. ही गोष्ट अपरिहार्य होय. हे गृहबंधन तोडून बाहेर येण्याचे धाडस कोणीही करू नये.
कैकयीच्या समाधानासाठी प्रभू रामचंद्र चौदा वर्षे वनवासात गेले होते, असे आपण रामायणामध्ये ऐकतो आणि वाचतो. त्याप्रमाणे सध्या कोरोनारूपी कैकयीला शांत करण्यासाठी आपल्याला फक्त एकवीस दिवस घरात बसून राहावयाचे आहे. हा रामाने भोगलेला त्रासदायक वनवास नसून सर्व कुटुंबीयांसोबत असलेला गृहवास होय, हे लक्षात घ्यावे. सर्व अनुकूलतेने हा गृहवास पत्करायचा आहे.
अनेक डॉक्टर्स, नर्सेस, शुश्रूषासेवक, पोलीस हे सर्वजण आपले सर्वांचे आरोग्य जपण्यासाठी स्वत:चे घर, कुटुंब सोडून रात्रंदिवस राबत आहेत. शरीराचे सर्व आवेग सहन करीत शुश्रूषाकार्य करीत आहेत. अनेक डॉक्टर्स आपल्या कुटुंबापासून दूर राहून संन्याशाप्रमाणे राहत आहेत. त्यांच्या या त्यागाची किंमत आपण कधीही चुकवू शकणार नाही. आपल्याला एवढेदेखील करण्याची गरज नाही.
घरातील एकांतवासात वेळेचा सदुपयोग करून घेण्याची एक संधी आपल्याला मिळाली आहे. सध्या टीव्ही, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा माध्यमांवर आपण वेळ घालवत आहोत. त्यामधील थोडा वेळ काढून आणि घरात परस्परांतील अंतर राखून पंचाक्षरी मंत्राचे, महामृत्युंजय मंत्राचे किंवा आपल्या इष्टदेवाच्या मंत्राचे सामूहिक रूपाने पठण करणे अधिक योग्य राहील. या वाचिक जपामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन सर्वांना मन:शांती लाभेल. यामुळे सर्वधर्मीयांमध्ये सद्भावना निर्माण होईल.
हे गृहबंधन संपेपर्यंत सर्वांनी अल्पाहार घेणे योग्य ठरेल. शरीराला काहीच कष्ट नसताना भरपेट खाणे अपायकारक ठरू शकते. ज्यांना शक्य आहे त्यांनी निराश्रित लोकांसाठी योग्य पद्धतीने अंतर राखून अन्नवाटप करावे. याकाळात यासारखे दुसरे पुण्यकार्य नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे काम करीत आहे. त्यांना या कामी शक्य ते सहकार्य केले पाहिजे. जाणिवपूर्वक कायदा तोडून कोणीही घराबाहेर पडू नये. यासाठी सर्व धर्मीयांचे सहकार्य आवश्यक आहे. आपण सर्वांनी घरात बसून नियमांचे काटेकोर पालन केले तर कोरोना महामारी शांत होऊन जग तिच्यापासून मुक्त होईल.
सध्या सर्व लोक घरात बसल्यामुळे निसर्गातील वातावरण शुद्ध होत आहे. कारखाने बंद
आहेत, डिझेल-पेट्रोल जळणे बंद आहे आणि माणसांचे बाहेर फिरणे बंद आहे. त्यामुळे प्राणी आणि
पक्षी निर्भयपणे बागडताना
दिसत आहेत. कोरोनाने आपल्याला हा धडा शिकवला की, घरी शांत बसाल आणि बाहेरच्या वातावरणात फार ढवळाढवळ करीत नसाल
तर निसर्ग आपल्या मूळ स्वरूपात टिकून राहील. म्हणून आपल्या हातावर संयम ठेवून वेळेचा सदुपयोग करून घ्यावा.

श्रीकाशी जगद्गुरू
डॉ. चंद्रशेखर
शिवाचार्य

Web Title: Make the good use of your time by exercising patience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.