आत्मज्योतीपासून दुरावलेला मनुष्य अंधकारात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 08:59 AM2020-03-16T08:59:01+5:302020-03-16T08:59:24+5:30

अखंडित सुखाचा अनुभव जीवनात घ्यायचा असेल तर नम्रता, शालीनता हे गुण अंगी बाळगा. कुटुंब, देश, राज्य यांच्या उन्नतीकरिताही मानवी जीवन महत्त्वाचे आहे.

A man blinded by self-consciousness in darkness | आत्मज्योतीपासून दुरावलेला मनुष्य अंधकारात

आत्मज्योतीपासून दुरावलेला मनुष्य अंधकारात

Next

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

आत्मा हेच खरे जीवन आहे. आत्मोन्नती हीच खरी मानवाची उन्नती आहे. आत्मज्योतीचा प्रकाश हा सत्य असून, आत्मज्योतीपासून मनुष्य दुरावला म्हणजे अंधकारात पडतो. या आत्मज्योतीला प्रकाशित करण्यासाठी शरीराचा आधार लागतो. शरीर सदा निरोगी व बलवान असेल तर आत्मज्योतीचा प्रकाश उत्तमरीतीने पाहता येतो. जीवनात नियमितपणा, संयम, प्राणायाम, व्यायाम या साधनांद्वारे शरीरसंपत्ती चांगली ठेवू शकतात. शरीरसंपत्ती नीटनेटकी असली की आत्मस्वरूपाजवळ जाण्यासाठी योग्य ते उपाय करता येतात. आपण जे करतो त्याला शुभचिंतन समजावे. शुभसंकल्प करावेत. मनाला कधीही पराजित होऊ देऊ नका. मन नेहमी प्रसन्न ठेवा. कारण मानवी जीवनात पहिल्यांदा मनाची प्रसन्नता महत्त्वाची आहे. मनाच्या प्रसन्नतेवरच सुखाची अनुभूती घेता येते. सुखाची अनुभूती आली की आत्म्याला शांती लाभते. आत्मा प्रसन्न झाला की शरीर अनेक विकारांपासून मुक्त होते. धन, पुत्र यांच्यापासून मिळणारे सुख शाश्वत नाही ते अखंडित राहू शकत नाही.

अखंडित सुखाचा अनुभव जीवनात घ्यायचा असेल तर नम्रता, शालीनता हे गुण अंगी बाळगा. कुटुंब, देश, राज्य यांच्या उन्नतीकरिताही मानवी जीवन महत्त्वाचे आहे. म्हणून शुद्ध, पवित्र, सत्य, न्यायमुक्त जीवन घालवा. आपला मान वाढेल, आपली विचारधारा बदलेल. दीर्घकाळ जीवनाचा उपभोग घ्याल. आपल्या जीवनात समता, बंधुता, सभ्यता, शिष्टता या गुणांची वृद्धी होईल. भौतिक ऐश्वर्य व आत्मिक ऐश्वर्य यांचा संयोग करून मानवी जीवनाला एक वेगळी दिशा द्याल. सुखाची धार वाढेल. मानवाचे उत्थापन होईल. वास्तविक जीवनाचा जवळून परिचय होईल. सद्सद्विवेक बुद्धी जागृत होईल. मग तुझे-माझे संपेल. आत्माच सर्वदूर निवास करतो याची प्रचिती येईल. आनंदाच्या सागरात डुबाल. आत्मसुखाची अनुभूती मिळेल. जीवन सार्थकी लागल्याचा अनुभव व्यक्त कराल. जीवन तेजोमयी होईल. जीवनात उच्चवत स्थिती प्राप्त होईल.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

Web Title: A man blinded by self-consciousness in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.