विचारभ्रमंतीचा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 04:46 AM2019-02-01T04:46:25+5:302019-02-01T04:49:10+5:30

विचारभ्रमंतीच्या ऊर्जेमुळेच मेंदूतल्या पेशींना नव्या वाटा दिसत राहतात.

man finds various ways after thinking | विचारभ्रमंतीचा चमत्कार

विचारभ्रमंतीचा चमत्कार

Next

- विजयराज बोधनकर

विचारभ्रमंतीच्या ऊर्जेमुळेच मेंदूतल्या पेशींना नव्या वाटा दिसत राहतात. नवी आशा नवा दिवस याचे अतूट नाते घट्ट होतच जाते. विचारभ्रमण हे जर अस्सल तत्त्वनिष्ठ असेल तर सकारात्मकता आपल्याशी जीवाभावाने मैत्री करते. माझ्या विचारांची पायवाट नेमकी मला कुठल्या दिशेला घेऊन जात आहे याची खात्री जो सतत करीत राहतो त्याची प्रत्येक गोष्ट ही नितांत सुंदर निर्माण होत राहते. मी आणि माझा विचार परिसर कसा स्वच्छ आणि संपन्न ठेवता येईल हा विचारच आयुष्याला सुंदर वळणावर आणून ठेवू शकतो. भ्रमंती कधीच संपू नये म्हणून पुस्तकांना मित्र मानून पानोपानी विसावलेल्या सुंदर घटना विचारभ्रमंतीला उत्तेजन देत राहतात. निरीक्षणाने आणि गंभीर मनाने अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो. प्रश्न सुटत जातात, उत्तराच्या बागेत चैतन्याची कर्मशाळा सहजसुंदर निष्ठेने फुलतच राहते.

विचारभ्रमंती संपली की मन साचलेल्या पाण्यासारखं बनत जातं, तसं होऊ नये म्हणूनच तर विचार अध्यात्म मनबुद्धीला सतत नव्या स्वरूपात तयार करीत राहतं. लोभाच्या सतत सहवासात राहिल्यामुळे निर्जीव इमले उभे राहतात, परंतु मनाची उंची मात्र खुंटत जाते. विचारभ्रमंतीला लोभ नासवू शकतो. अस्वस्थ करणारा लोभीपणा सहज सुंदर उलगडत जाणाऱ्या गोष्टींना दडपून टाकतो आणि या लोभाच्या दडपशाहीमुळे सुप्त मनाला यातना सहन कराव्या लागतात. याच सुप्त यातनेतून एखादा मनोरोगही जडण्याची शक्यता निर्माण होते. मनाची निर्भयता डळमळीत झाली की बुद्धीचा तोल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विचारभ्रमंतीसाठी अति लोभाचे खच्चीकरण करणेच उपयोगाचे ठरू शकते.

सुंदर विचार प्रकटीकरणाचे फायदे असे होतात की नव्या विचारांचे गुच्छ आपल्याच व्यक्तिमत्त्वाला नवे रूप नकळत बहाल करीत राहते. नवे आयाम प्राप्त होत राहतात. संकुचित विचारांचा नायनाट होऊन तिथे सशक्त विचारांची मालिका नव्या कल्पनांचा पाठपुरावा करीत सुटते. ती नव्याची नवी भूक नव्या निर्मितीला प्रोत्साहित करीत राहते. कल्पनाशक्ती वाढीला लागते ती केवळ विचारभ्रमणामुळेच! वाचन, मनन, चिंतनाची सततची मैत्री एका सहज सुंदर नव्या दुनियेत घेऊन जात राहते. ती आनंदाची विचार बाग नव्या रंगरूपासह फुलतच राहते. याचसाठी माणूस धडपडत असतो. नव्या संकल्पनांचा पाठलाग करीत राहणे हा तर मानवी स्वभावच आहे. अन्यथा आजही आपण बैलगाडीतूनच प्रवास करीत असतो. नवा दिवस उजाडतोच नव्या कल्पना घेऊन. भूतकाळ संपन्न असला की वर्तमान फुललेल्या फुलासारखा भासत राहतो.

बंद कळीलासुद्धा फुलात रूपांतर करण्यासाठी गतिमान भ्रमंती करावीच लागते, तेव्हा कुठे लपलेल्या पाकळ्या मुक्त होऊन आकार, उकार, रंग याचं दर्शन घडवत राहतात. कळीसुद्धा अफाट कार्यक्षमता अंगी आणून त्याचं प्रकटीकरण फुलातून दाखवत राहते. मनाच्या विश्वात अगणित ऊर्जेचा साठा भरून आहे. त्याला फक्त उत्तम विचारांची सोबत मिळाली की रंकाचा राजा बनू शकतो. म्हणूनच नव्या जगात अवतरणाºया जीवाला पहिले गुरू मिळतात ते आईवडील, दुसरे गुरूजन आणि त्यानंतर त्या विचार मंथनाला सुरुवात करताना स्वत:च स्वत:चा मार्गदर्शक बनत जातो आणि सततच्या विचारभ्रमंतीमुळे आयुष्याचे अनेक सुप्त पैलू चकाकून टाकतो. म्हणूनच विचारांची भ्रमंती करीत राहणे आजची महत्त्वाची गरज आहे.

Web Title: man finds various ways after thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.