पानी केरा बुदबुदा, अस मानुस की जात । एक दिना छिप जाएगा, जो तारा परभात ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:21 PM2018-09-14T22:21:22+5:302018-09-14T22:21:56+5:30

man is like water bubble, Spirituality article | पानी केरा बुदबुदा, अस मानुस की जात । एक दिना छिप जाएगा, जो तारा परभात ।

पानी केरा बुदबुदा, अस मानुस की जात । एक दिना छिप जाएगा, जो तारा परभात ।

googlenewsNext

 

धर्मराज हल्लाळे

माणसाचे आयुष्य म्हणजे पाण्यावरील बुडबुड्यासारखे आहे. अगदी क्षणभंगुर, संत कबीर यांनीही आपल्या दोह्यांमध्ये अंतर्मुख करणारे विचार दिले आहेत़ माणसाची जात म्हणजे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी आहे़ जसे आकाशातले तारे सकाळ होताच दिसेनासे होतात, तसे माणूसही कोणत्याही क्षणी आपले अस्तित्व सोडून निघून जातो़ मृत्यू अटळ आहे़ तरीही अमरत्वाचा गुण ठायी-ठायी भरलेला असतो़ शेवटच्या क्षणापर्यंत लोभ, माया सुटत नाही़ स्वाभाविकच संतांनाही प्रश्न पडतो, असे काय घडते की माणसे आपल्या अस्तित्वाला प्रश्न विचारत नाहीत़ सत्ता, संपत्तीचा संग्रह करण्याचा विचार अखेरपर्यंत कायम ठेवतात़ नक्कीच निसर्गाने माणसाला जशी स्मरणशक्ती दिली आहे, त्याहूनही दांडगी विस्मरणशक्ती दिली आहे़ त्याचाच परिणाम म्हणून मरणाचेही विस्मरण होते. 

कधी कोणासाठी स्मशानात पोहचल्यावर माणसाचे काय, पाण्यावरचा बुडबुडा हे आठवते़ मात्र ती आठवण म्हणजे स्मशानवैराग्य असते़ ज्याक्षणी स्मशानातून पावले बाहेर पडतात़, त्याक्षणी स्व म्हणजेच स्वार्थ जागा होतो. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, म्हणजे त्याचा अर्थ स्वत:चे भले करणे इतके सिमित नाही़ आयुष्य क्षणभंगुर म्हटल्यावर दोन विचार मांडणाºया प्रवृत्ती अवतीभोवती चटकन दिसतात़ एक म्हणजे माणसाचे काय खरे आहे, कधी होत्याचे नव्हते होईल म्हणून जितक्या वेगाने स्वत:भोवती फिरता येईल तितके स्वत:भोवती फिरत राहणे़ अगदी जे दिसेल ते कसे मिळविता येईल, आनंद मिळविण्यापेक्षा कसा ओरबडता येईल, असा अविचार दिसतो़ मात्र संतांना जे अभिपे्रत आहे ते म्हणजे आयुष्याचा मिळालेला अल्प क ाळ सद्विचार, सद्वर्तनाने घालवावा़ कुठलाही संग्रह सोबत येणार नाही. 

जीवसृष्टीतील माणसांनाच हे संत वचन पुन्हा पुन्हा सांगावे लागते़ मानव जात वगळता कुठलाही प्राणी उद्याचा विचार करून संचय करीत नाही़ मानवी मेंदूने मानव जातीची प्रगती केली़ त्या वाटेवर माणूस इतका रूतून बसला की तो सद्मार्ग विसरला़ जसा एकट्याचा हव्यास तसा समुहाचा झाला़ ज्याने आपल्यासमोर विध्वंसच मांडून ठेवला़ मी, माझे कुटुंब, माझे गाव, माझा प्रदेश अशा सीमा अन् अहंकारात बुडालेला माणसांचा समुदायही प्रलय आल्याखेरीज सावध होत नाही़ शेवटी एकच शाश्वत सत्य म्हणजे मानव कल्याणाचा विचाऱ जो संतांनी प्रत्येक वचन सांगताना व्यापक अर्थाने आपल्यासमोर ठेवला़ स्वत:च्या वा आपल्या समुहाच्या स्वार्थासाठी संचय करू नका अन् निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा विनाशही करू नका़ पृथ्वीच्या रंगमंचावर वाट्याला आलेली भूमिका मानव जातीच्या उत्कर्षाची असू द्या़ कारण शेवटी हा देह पाण्यावरचा बुडबुडा आहे.

Web Title: man is like water bubble, Spirituality article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.