मंत्रोच्चारण...भजन...ईशस्तुती....प्रवचन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:05 PM2020-06-27T16:05:57+5:302020-06-27T16:06:23+5:30
आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते
प्रार्थनेतही अंतर्मुख करण्याची, लीनता निर्माण करण्याची, विनम्र भाव निर्माण करण्याची शक्ती असते. मोठयाने उच्चारलेले मंत्रोच्चारण, एखादे ठेक्यात आणि तालात एकत्र म्हटलेले भजन, चर्चमध्ये गायली जाणारी ईशस्तुती, प्रवचन या सगळ्यातून अमाप मनशांती आणि समाधान मिळते. देऊळ, देवळातले वातावरण, भजन-कीर्तन, नामस्मरण, चर्च- मशिदीतील वातावरण या सगळ्याचा आध्यात्मिकता वाढण्यासाठी उपयोग होतो. योग, प्राणायाम आणि ध्यान केल्यामुळे चिंता, उदासपणा, हृदयरोग, अतिरक्तदाब अशा अनेक विकारांमध्ये उपयोग होतो. स्वतकडे बघण्याची सवय होते. लक्ष केंद्रित करता येते. वर्तमानात जगण्याची शिकवण मिळते. अशा गोष्टींमुळे मानसिक स्वास्थ्य वाढीस लागते.
कॅन्सरसारख्या विकाराचा सामना करताना किंवा हृदयरोग स्वीकारताना किंवा मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेतून बरे होताना जी अति चिंता निर्माण होते ती नियंत्रणात आणण्यासाठी आध्यात्मिकतेचा उपयोग होतो. आपत्तीनंतरच्या काळात आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांच्या उपदेश- प्रवचनांचा अतिशय सकारात्मक उपयोग होतो हे आपल्याकडच्या लातूरच्या, कच्छच्या भूकंपानंतर अनुभवायला आले आहे. या प्रक्रियेत सामूहिकतेची भावना आणि एकमेकांना मिळणारा मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो. मानसिक विकारांची रुग्णाकडून माहिती घेताना त्याचा धार्मिक, आध्यात्मिक दृष्टिकोन समजून घेणे दिवसेंदिवस महत्त्वाचे बनले आहे. मानसिक उपचारांमध्येदेखील आध्यात्मिकतेचा उपयोग केला जाऊ लागला आहे.
आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते. नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या कालाविष्कारांतूनही आध्यात्मिकता व्यक्त होते. निसर्गाच्या सान्निध्यातही एक अवर्णनीय मानसिक शांती प्राप्त होते.
आपल्याकडे संतसाहित्यही आध्यात्मिकतेतून मनाचा विचार मांडताना दिसते.
- ह.भ.प़ सुधाकर इंगळे-महाराज, सोलापूर