चुकांबद्दल मध्यम मार्ग; ‘अरेरे, अशी कशी चूक केली मी!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:54 AM2018-10-10T01:54:00+5:302018-10-10T01:54:21+5:30
‘चुका’ होतच असतात, पण बहुदा आपण त्यासाठी पश्चाताप करू लागतो. ‘अरेरे, अशी कशी चूक केली मी!’ आणि त्याबद्दल अपराधी वाटू लागते किंवा ती चूक घडलीच नाही, असा आव आणतो आणि ती मुळी चूक नाहीच आहे, असे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो, पण या दोन्ही मार्गांनी त्या व्यक्तीची हानीच होते.
- श्री श्री रविशंकर
‘चुका’ होतच असतात, पण बहुदा आपण त्यासाठी पश्चाताप करू लागतो. ‘अरेरे, अशी कशी चूक केली मी!’ आणि त्याबद्दल अपराधी वाटू लागते किंवा ती चूक घडलीच नाही, असा आव आणतो आणि ती मुळी चूक नाहीच आहे, असे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो, पण या दोन्ही मार्गांनी त्या व्यक्तीची हानीच होते. एकामध्ये अस्वीकार आहे, तर दुसऱ्यात अपराध भावात अडकून राहतो आणि आपल्या चुकांबद्दल लाज वाटत राहते. इतके की, त्यामुळे आजार ओढवून घेतो म्हणून या दोन्हीच्या मधला मध्यम मार्ग अनुसरायला हवा. जेव्हा तुम्ही चूक केली असेल, तेव्हा त्याबद्दल वारंवार पश्चाताप व्यक्त करीत बसू नका आणि दु:खी होऊ नका. मग त्याच वेळी तुम्ही चूक केलीय हे नाकारू नका. इथे मध्यम मार्ग हाच आहे की, आपण चूक केली आहे आणि त्यापासून कधीतरी बोध घेतला आहे, याची जाणीव असू द्या आणि आपली वाटचाल सुरू ठेवा. कोणीही मुद्दाम चूक करीत नाही. सजगता नसल्याने त्या घडतात एवढेच़ एकदा त्या सजगतेचा तुमच्या आत उदय झाला की, अज्ञानामुळेच तुमच्या हातून चूक झालीय, याची जाणीव स्वत:ला द्यावी. याबद्दल भान आल्याने तुम्ही त्या चुकातून बाहेर याल़, तसेच नेहमी दुस-यांच्या चुका दाखवून देणे आणि त्यांना त्याबद्दल दोषी असल्याचे जाणवून देणे हेसुद्धा योग्य नाही़ नंतर ते तुमच्यापासून अंतर राखू पाहतील़ ते तुम्हाला कधी काहीही सांगणार नाहीत़ किंवा तुमच्यासमोर व्यक्त होणार नाहीत़ असे होणे हे भविष्यात घातकही ठरू शकते़ तसे होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी नेहमी दुसºयांना त्यांच्या चुकांबद्दल अपराधी वाटू न देता, त्या चुकांची जाणीव करून देणे हीसुद्धा एक कला आहे़ तुम्हाला हे खूप कौशल्याने करायचे आहे आणि त्यानंतर त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना प्रोत्साहित करा आणि म्हणा, ‘चला, जाऊ द्या़ काही हरकत नाही़ चुका होतात. मी हे विसरलोय. तुम्हीसुद्धा आता ते विसरून जा़’ कुणालाही अपराधी भावात अडकवून राहू देऊ नका किंवा त्यांना अपराध्या सारखे वाटू देऊ नका़ कुणा व्यक्तीला असे सतत अपराध्यासारखे वाटायला लावले, तर ती व्यक्ती परत अधिक चुकीची कृत्ये करीत राहील. त्याच्या हातून मोठी चूक होऊ शकते. तो आपला मार्ग कधीही सुधारणार नाही, म्हणून आपल्या मनाला यातून वाचविण्यासाठी प्रथम त्याला अपराधीपणाच्या किंवा पीडित भावापासून वाचवावे लागेल.