शुद्धतेतून भक्त व भगवंताचे मीलन - ब्रह्मेशानंद स्वामी महाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:12 PM2018-10-27T23:12:53+5:302018-10-27T23:13:26+5:30
बाह्य शुद्धता करता करता आंतरिक शुध्दता राखता आली पाहिजे. देहामध्ये वास करणारा भगवंत शुध्दतेमुळे आहे. यासाठी तन, मन,
आपल्या कार्याला शिस्त नसेल तर देव त्यास जवळ घेत नाही. मग ते देवाचे भजन-कीर्तन असो, जप तप असो. हे कार्य करणारा स्वतः शुद्ध राहिला पाहिजे. जेथे शुद्धता असते तेथे देव वास करतो. आपण शुद्धच राहिलो नाही तर देव आपल्यापासून दूरच राहणार. भक्तांनी शुद्धतेत रहायला शिकले पाहिजे. शरीर शुद्ध राखले पाहिजे. शरीराची शुद्धता, वातावरणाची शुद्धता, इंद्रियांची शुद्धता, येनकेन प्रकारे ज्या ज्या माध्यमांतून आपला शुद्धतेचा संबंध येतो, त्या सर्वांकडे आपण शुद्धतेचा संदेश पोचवला पाहिजे. शुद्धतेमध्ये भगवंत विराजमान असतो म्हणून त्याला स्वच्छता आवडते.
बाह्य शुद्धता करता करता आंतरिक शुध्दता राखता आली पाहिजे. देहामध्ये वास करणारा भगवंत शुध्दतेमुळे आहे. यासाठी तन, मन, स्वच्छ केले पाहिजे. आपले बोलणे, ऐकणे सुध्दा शुध्द असले पाहिजे. साहजिकच यामुळे समाजात सज्जनांची वस्ती वाढेल.आज भ्रष्टाचार फोफावला आहे,अशुध्दता प्रचंड वाढली आहे. म्हणून आपल्या मनाला सात्त्विकतेचा संदेश आपणच दिला पाहिजे. संत संगतीमध्ये शुध्दता आपणच निर्माण केली पाहिजे. आपल्याला संसारात काम , क्रोध, मोह, मद, मत्सर याही षडरिपुंची गरज आहे. कारण त्या भगवंतानी आपल्याला दिलेल्या आहेत. जी जनावरं दुसऱ्यांना मारून खातात त्यांना पाळू नये. मांस भक्षण केल्याने आपली प्रकृती अशुध्द बनते. दुसऱ्याचे मांस खाऊन जगण्यात काय अर्थ राहणार ?
सात्विकता हृदयात ठेवली पाहिजे म्हणून आहार शुध्द असावा. मुखाला शुध्द राखले पाहिजे. कारण मुखातून निघालेला एक शब्द जरी विषारी असला तर तो कितीतरी लोकांची मने कलुषित करून टाकतो. एवढी जबरदस्त ताकद एका शब्दामध्ये असते. या वाणीतून चांगलीही कामे होऊ शकतात. पण जे लबाडीकरिता आपली वाणी खर्च करतात, त्यांना भगवंताकडून क्षमा नाही. लबाडीचे शब्द पूजनीय नाहीत .एक शब्द वाकडा पडला तर त्याची गंभीर किंमत चुकवावी लागते.आपल्या वाणीतून स्वहिताचे शब्द ,चांगले शब्द आले पाहिजेत. त्यामुळे आपले कल्याण होते.
आपले जीवनव्रत ही भगवंत सेवा आहे. येथे भगवंत नित्य प्राप्त आहे. येथे भगवंत आहे तोच मिळतो, त्याला कोणत्याही प्रांतातून हुडकून आणण्याचा वृथा प्रयत्न करावा लागत नाही. याचे कारण कोणत्याही वासनेच्या तथा कामनेच्या पूर्ततेसाठी त्याचा संबंध आम्ही मानलेला नाही. उलट तोच एकंदर कर्तव्य-कर्माच्या ठिकाणी सदा प्राप्त राहतो आहे. तर आणखीन त्याच्याकडे काय मागायचे बाकी आहे. भगवंत भक्त आहे तो द्वितीय जाणत नाही .' देव ,भक्त -दुजा ना विचार ' म्हणूनच भक्ताला तो नित्य प्राप्त राहतो. यामुळेच त्यास भक्त ही संज्ञा प्राप्त आहे. असा जो भक्त ज्या ठिकाणी वास करतो, तेच भगवंत मिळण्याचे स्थान आहे.
जो व्रती आहे त्याला भगवंताचा भागवत धर्म पाळावाच लागतो. अन्य उपचारांना तिलांजली देऊन जो शुध्द झालेला असतो तोच व्रताचरण होय. भगवंतावाचून अन्य कोणाचीही सत्ता भक्ताला मान्य राहत नाही. जडचेतन रूपाने केवळ त्याचाच संस्पर्श जो प्राप्त राहत आहे त्या अविनाशिकाचा परिचय देणे हेच एकमात्र कर्तव्य त्यास मान्य राहत आहे. उभय रूपात अभिन्न एकत्वाने सम-समान राहणे ज्या परम तत्वाचे सदा आपल्या भावाचे अनुरूप प्राप्त राहणे आहे. त्याच्याशी नित्य - संबधित तथा नित्य -युक्त राहण्याचे लक्षण प्रगटही राहत आहे. भक्त व भगवंताचे मीलन होय.
शब्द-संकलन : किशोर स. नाईक, डोंगरी गोवा