अवघा तो शकुन... हृदयी देवाचे चिंतन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 06:58 PM2021-01-20T18:58:52+5:302021-01-20T18:59:02+5:30
जेथे हरिचिंतन अखंड आहे तेथे अखंड हरिनिवास आहे व जेथे अखंड हरिनिवास आहे तेथे अखंड मंगलाचा निवास आहे.
शुभ शकुन व अपशकुन. शकुन म्हणजे शुभाशुभाची चिन्हे ज्याला आज तरी तेवढे मानले जात नाही. पण कधीकाळी त्याचा प्रचंड पगडा मानवी मनावर होता. मांजर आडवी जाणे हा मोठा अपशकुन मानला जायचा व त्याला आजही काही लोक मानतात असे बरेचदा दिसून येते. सुमारे सातशे वर्षापूर्वी सहदेव भाडळी या बहिणभावांनी केलेले शकुन शास्त्र मागील शतकापर्यंत सर्वश्रृत होते. यात काव्यमय संकेत असायचे जसे,
एका नाके बहु शिंका । सहदेव म्हणे शकुन निका ॥
म्हणजे एकाच नाकपुडीतून खूप शिंका आल्या तर तो चांगला शकुन आहे असे समजावे
शकुन दोन प्रकारचे मानले जातात. एक आंतरिक शकुन व दुसरा बाह्य शकुन. आंतरिक शकुनाचा संबंध व्यक्तिच्या शारीरिक क्रियांशी जोडला जायचा. जसे डोळा फडफडणे, विशेषता डाव्या डोळ्याचे फडफडणे, तळहात खाजवणे, बाहु स्फुरण होणे इत्यादिचा आंतरिक शकुनात समावेश होतो. दुसरा बाह्य शकुन. याचेही दोन प्रकारचे मानले जातात. एक म्हणजे पशु पक्षी आदि जीवांचे क्रियाकलापावर आधारित तर दुसरे अंतरिक्षी शकुन. ज्यामध्ये चंद्र, नक्षत्रे, ग्रह, धुमकेतु, उल्कापात दर्शन आदि यावरुन भविष्यातील शुभ अशुभ घटनांचे संकेत सांगितले जायचे.
अशा प्रकारे जीवनात काही चांगलेच व्हावे या अपेक्षेपायी माणसाचे मनात शुभाशुभाचे चिंतन सुरु असते. शुभाशुभ शकुनाला मानणारी माणसं एकप्रकारे काेणत्याही कार्यात काही वाईट होऊ नये, अमंगल होऊ नये म्हणून मंगल मुहूर्त पहायची. शकुनाला लक्षात घ्यायची. आज मुहूर्त केवळ लग्नपत्रिकेवर लिहिण्यापुरता आहे. पालन करण्यासाठी नाही. एक काळ होता शकुनाची वा सुमुहूर्ताची माणूस काळजी घेत होता , तेथे आता निष्काळजी झाला आहे. परंतु शकुनाबद्दल संत काळजी घेत नाहीत वा निष्काळजीही होत नाहीत.
अवघा तो शकुन । हृदयी देवाचे चिंतन ॥
येथे नसता वियोग । लाभा उणे काय मग ॥
अवघा शकुन. तुकोबाराय म्हणतात, चांगला असो का वाईट आमचे साठी अवघा शकुन सारखाच आहे. कारण संसार आहे तर चांगल्या वाईट शकुनावर चिंतन होते. पण चिंतन हृदयात देवाचे सुरु झाले. मग चांगल्या शकुनाचे कर्मधैर्य वा वाईट शकुनाची मनी भीती, हे काहीच राहिले नाही. कारण जेथे हरिचिंतन अखंड आहे तेथे अखंड हरिनिवास आहे व जेथे अखंड हरिनिवास आहे तेथे अखंड मंगलाचा निवास आहे. अखंड निवास आहे मंगलाचा तर मंगलाचा वियोग नाही. मग अलभ्य असे काय राहिले. ज्याला विश्वाचे परम मांगल्य मिळाले त्याला अलभ्य काय राहिले. त्यामुळे लाभ हानी, शुभ अशुभ, मंगल अमंगल ह्या सांसारिक व्दंव्दातून तुकोबाराय मुक्त झाले. ठेवीले अनंते तैसेचि राहावे हा बोधपूर्ण निर्धार होऊन तुकोबांचे जगणे सुरु झाले, त्याचक्षणी अपशकुनाचे भय संपले व शुभशकुनाची आस्था संपली.
हृदयी देवाचे चिंतन आहे व देवाचा वियोग नाही तर तेा कशामुळे ? तुकोबाराय म्हणतात
. छंद हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥
तुका म्हणे हरिच्या दासा । शुभकाळ अवघ्या दिशा ॥
देवाचा वियोग नाही याला कारण तुकोबांना अखंड हरिनामाचा लागलेला छंद. लोक संसाराचे छंदी होतात. दारुचे छंदी होतात, खाण्याचे, पिण्याचे, जगण्याचे छंदी होतात. संतांना हरिनामाचा छंद लागतो. अखंड हरिनामाने वाचा सदैव शुध्द होते. तुकोबा म्हणतात, हरिभक्ताला, हरिदासाला सर्वत्र, सर्व दिशांना सर्वकाळ शुभकाळ आहे. दिशेचेही नांव तुकोबा यामुळे घेतात की, शकुन दिशांचे बाबतीतही पाळला जातो. पण आता तुकोबांसाठी सर्व दिशा शुभ झाल्या, सर्व दिशांना शुभकाळ आहे.
सुफला एकादशीचे पावन पर्वावर
संतश्रेष्ठ तुकोबारायांना श्रध्दा नमन !
शंना.बेंडे पाटील