मानसिक सुख हे शारीरिक सुखापेक्षा तिप्पट जास्त महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:28 AM2019-01-26T04:28:49+5:302019-01-26T04:28:58+5:30
आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करता, ते त्यापासून सुख मिळते म्हणून. जीवनात तुम्हाला काय हवे असते तर सुख.
- श्री श्री रविशंकर
आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करता, ते त्यापासून सुख मिळते म्हणून. जीवनात तुम्हाला काय हवे असते तर सुख. तुम्हाला पैसे कशासाठी हवे असतात, तर सुख मिळविण्यासाठी. कोणत्याही प्रकारची कोणतीही गरज ही शेवटी सुखासाठी असते. सुखाचेही वेगवेगळे स्तर आहेत. एक आहे शारीरिक - तुम्ही जर गवतावर बसला असाल, तर तुम्हाला वाटते की, ‘एक उशी असती तर बरे झाले असते.’
दुसरे आहे मानिसक सुख - हे तर आणखीनच आवश्यक आहे. जरी तुमचे घर सुखदायी असले, पण मन सुखी नसले, तर तुम्ही त्या आरामदायी गादीवरही नीट झोपू शकणार नाही. आणखी एक आहे भावनिक सुख. तुमच्याकडे सगळे काही असेल, पण तुमच्या अगदी जवळची एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल किंवा त्याने तुम्हाला दुखावले असेल, तुमचे भावनिक सुख गेलेच. आणखी एक म्हणजे आध्यात्मिक सुख. हे सुख आत्म्याचे असते. पूर्ण शांती, आतून येणारा अखंड असा शांती आणि आनंदाचा झरा. असे सुख म्हणजे तुम्ही स्वत: आहात तसे असणे. सुख कुठे असते ? ते शरीरात असते की मनात ? ते दोन्हीचा मिलाफ असते. कधी-कधी शरीर सुखी नसेल, तर मनही सुखी नसते आणि मन सुखी नसेल तर शरीर सुखी नसते. शरीरापेक्षा मनाचे सुखी असणे जास्त महत्त्वाचे. मन शरीरापेक्षा तिप्पट जास्त सामर्थ्यवान असते. त्यामुळे मानसिक सुख हे शारीरिक सुखापेक्षा तिप्पट जास्त महत्त्वाचे असते. सुख हे बांधिलकी/वचनबद्धतेवर अवलंबून असते. इतरांची वचनबद्धता तुम्हाला सुख देते. उदाहरणार्थ, रोज दूध आणून देण्याची दूधवाल्याची वचनबद्धता तुम्हाला सुख देते. तुमच्या वचनबद्धतेमुळे इतरांनाही सुख मिळायला हवे. कधी-कधी लोक म्हणतात की, ‘या बांधिलकीमुळे मी दु:खी आहे.’ मात्र, असे समजू नका.