दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 06:55 PM2019-04-25T18:55:23+5:302019-04-25T18:58:56+5:30

क्षमेचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ति । अवघी हे क्षिति एकरूप ॥१॥ शांति दया पैसे क्षमा जयारूप । अवघेंचि स्वरूप आत्माराम ...

Mercy forgiveness resided there God there peace | दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती...!

दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती...!

googlenewsNext
ठळक मुद्देआपण अज्ञानी जीवाने सुद्धा दया, क्षमा, शांती या गुणांचा अंगीकार करावा ज्यांच्या ठायी हे गुण आहेत त्यांची संगती करावी असा गुप्त रुपाने उपदेश आपल्या देहाच्या प्रत्येक इंद्रियाद्वारे क्षमा हा गुण विस्ताराला येतो

क्षमेचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ति ।
अवघी हे क्षिति एकरूप ॥१॥
शांति दया पैसे क्षमा जयारूप ।
अवघेंचि स्वरूप आत्माराम ॥२॥
निंदा द्वेष चेष्टा या अभिमान भाजा ।
सांडुनिया भजा केशवासी ॥३॥
निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्त ।
अवघींच समस्त गिळियेलीं ॥४।

प्रस्तुत सेवेसाठी आलेला अभंग श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचा उपदेश प्रकरणातील असुन आपल्या अज्ञानी जीवांना उपदेश करणारा असा चार चरणाचा अतिशय सुंदर आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की क्षमेचा विस्तार हीच क्षेत्रज्ञाची वृत्ती आहे म्हणजे आपल्या देहरुपी क्षेत्रात वास करणारा क्षेत्रज्ञ किंवा आत्मा, परमात्मा क्षमाशील आहे , याचीच प्राप्ती सदगुरू कृपेने करुन घेतली असता आपल्या वृत्तीच्या द्वारे त्याच क्षेत्रज्ञाच्या गुणाचा विस्तार होतो म्हणजे आपल्या देहाच्या प्रत्येक इंद्रियाद्वारे क्षमा हा गुण विस्ताराला येतो किंवा आपल्या वृत्तीच्या सामर्थ्यावर इंद्रियाद्वारे क्षमा बाहेर प्रसवते म्हणजे विस्तार पावते. अशी अवस्था झाली असता आपण अपकार्यावर सुद्धा उपकार करायला लागतो कारण सर्व विश्व हे आपलेच एकाचे स्वरुप आहे अशी त्यांची दृष्टी स्वस्वरुपाच्या ठिकाणी एकरुप झालेली असुन त्यांच्याच ठिकाणी शांती, दया, क्षमा नांदुन आहे हेच ज्यांचे रुप आहे त्यांनाच अवघ्या विश्वात एका आत्मारामाचे स्वरुपाचा अनुभव येतो.

कारण दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती म्हणजे ज्यांच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती हे गुण नांदत आहेत तेथे साक्षात देवाची वस्ती असुन तोच देह देवाचे साक्षात घरच आहे आणि देवच वस्तीला आले म्हटल्यावर त्यांना सहजच आत्मरामाच्या स्वरुपाचा साक्षात्कार झाला आहे म्हणून त्यांना अवघ्या विश्वात एका आत्मरामा शिवाय दुसरे काहीच दिसत नाही. म्हणून आपण अज्ञानी जीवाने सुद्धा दया, क्षमा, शांती या गुणांचा अंगीकार करावा किंवा ज्यांच्या ठायी हे गुण आहेत त्यांची संगती करावी असा गुप्त रुपाने उपदेश करीत आहेत. एवढेच नाही तर निंदा, द्वेष, चेष्टा ज्या अभिमानाच्या संगतीने घडतात त्या अभिमाला भाजा म्हणजे जाळून टाका मग अभिमान गेला  तुका म्हणे देव झाला अशी अवस्था प्राप्त होईल. या करीता अभिमान सांडून किंवा सोडुन केशवाला भजा म्हणजे भगवंताचे अखंड प्रेमपुर्वक नामस्मरण, भजन करा. असा उपदेश करीत आहेत.

शेवटच्या चरणात महाराज सांगतात की आम्ही ( या निवृत्तीने ) सुद्धा सदगुरू कृपेने अभिमान रहित होऊन एकरुप चित्ताने भगवंताचे भजन केले आहे म्हणून अवघ्याच गुणदोषांना गिळून टाकले आहे म्हणजे गुणदोषांच्या पलिकडे असलेल्या किंवा दोषरहीत, गुणातीत असलेल्या पांडुरंग परमात्म्याला आपलेसे करुन अवीट आनंदाचा उपभोग घेत आहोत. आणि आपण इतरांनी सुद्धा याच ( संतांच्या, सदगुरुंच्या ) वाटेने जाऊन अवीट असा अपरिमित आनंद प्राप्त करुन घ्यावा. 

-  ह.भ.प. वसंत साठे महाराज,
बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर

Web Title: Mercy forgiveness resided there God there peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.